संतोष मिठारी, कोल्हापूर : अनुदानित महाविद्यालयांप्रमाणेच शैक्षणिक शुल्क (ट्युशन फी) आकारून कार्यरत राहाणे विनाअनुदानित महाविद्यालयांना जिकिरीचे बनले होते. त्याचा परिणाम शैक्षणिक सुविधा आणि गुणवत्तेवर होऊ लागला. हे लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने विनाअनुदानित महाविद्यालयांना कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे शैक्षणिक शुल्क निश्चित केले आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील २५ महाविद्यालयांना दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेची १२१ अनुदानित, तर २५ महाविद्यालये विनाअनुदानित आहेत. या विनाअनुदानित महाविद्यालयांना आतापर्यंत अनुदानित महाविद्यालयांप्रमाणेच शुल्क आकारावे लागत होते. साधारणत: ८०० ते १२०० रुपयांपर्यंत हे शुल्क होते. विद्यार्थ्यांकडून जमा होणार्या शुल्काच्या रकमेतून प्राध्यापकांचे वेतन, वेतनोत्तर खर्च भागविताना या विनाअनुदानित महाविद्यालयांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये आवश्यक ती पात्रता नसणारे प्राध्यापक, प्रभारी प्राचार्य, पायाभूत सुविधांचा अभाव होता. या परिस्थितीमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत होता. ते बदलण्यासाठी विद्यापीठाने या महाविद्यालयांना शुल्क निश्चितीचा प्रस्ताव विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला. त्यांच्या मान्यतेनंतर प्रतिविद्यार्थी या स्वरूपात शुल्क निश्चिती केली आहे. त्यात कला, वाणिज्य शाखेसाठी केवळ शैक्षणिक शुल्काचा, तर विज्ञान शाखेसाठी शैक्षणिक आणि प्रयोगशाळा शुल्काचा समावेश आहे. त्यासह प्रवेश, जिमखाना, ग्रंथालय शुल्क आणि विकास निधी आदी स्वरूपातील शुल्क विद्यापीठाच्या नियमांनुसार आकारण्यात येणार आहे. त्यासह दर तीन वर्षांनी दहा टक्क्यांनी शैक्षणिक शुल्कात वाढ करता येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या शुल्क संरचनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यापीठाने अशा पद्धतीने केलेल्या शुल्क निश्चितीमुळे विनाअनुदानित महाविद्यालयांना बळ मिळणार आहे.
विनाअनुदानित कॉलेजचे शुल्क निश्चित
By admin | Published: June 03, 2014 11:58 PM