कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात विनापरवाना उभा केलेल्या गणेशोत्सवातील मंडपावर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील ८ मंडळांच्या मंडपावर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली.
ही कारवाई बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ या परिसरातील ६ मंडळांवर व यादवनगर, महालक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एका मंडळावर करण्यात आली.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता व पवडी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
त्यामुळे शहरातील सार्वजनिक मंडळांनी उभारलेले विनापरवाना मंडप आपण स्वत:हून काढून घेऊन महापालिकेस सहकार्य करावे व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.