- इंदुमती गणेश ।कोल्हापूर : दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिन कोठे आणि कुणाच्या हस्ते साजरा होतो?, मुंबईमध्ये मुख्य ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते?, राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत?, अशा मूलभूत प्रश्नांचेही ज्ञान अनेक नागरिकांना नसल्याचा निष्कर्ष ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. ‘अशोकचक्र’चा प्रश्न वगळता अन्य कोणत्याही प्रश्नावर शंभर टक्के अचूक उत्तरे आलेली नाहीत. यावरून देशाप्रतीच्या प्राथमिक माहितीचाही किती अभाव आहे, याची जाणीव या सर्व्हेवरून झाली.भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन आज, शनिवारी साजरा होत आहे. यानिमित्त प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’च्यावतीने विविध वयोगटांतील, तसेच शंभर नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला. यात दहा प्रश्न विचारण्यात आले होते.
प्रजासत्ताक दिन कसा साजरा करावा? या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी लावणे, जिलेबी खाणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणे म्हणजे देशाचा उत्सव असे त्याचे स्वरूप राहू नये, असे म्हटले आहे. स्वच्छता, भ्रष्टाचाराचा बीमोड, स्त्री सन्मान, आरोग्य, शिक्षण, सर्वधर्म समभाव, अशा देश व समाज हिताच्या गोष्टींचे कर्तव्य पार पाडावे. नव्या पिढीला राष्ट्राची माहिती मिळावी, निवृत्त जवान, शहीद जवान यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करावा, गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी, रस्त्यावरचे आयुष्य जगणाऱ्यांना मदत करावी, अशा संकल्पना मांडल्या आहेत.राजपथ, राष्ट्रपती आणि राज्यपालप्रजासत्ताक दिनाचा दिल्लीतील मुख्य सोहळा राजपथवर राष्ट्रपतींच्या हस्ते होतो. मुंबईतील कार्यक्रम राज्यपालांच्या हस्ते होतो, तर राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग आहेत. सुट्टी आणि धम्माल यादृष्टीने या दिवसाचे नियोजन केले जात असल्याने ६० टक्क्यांहून अधिक लोक ध्वजारोहणाला उपस्थित नसतात.लोकमत सर्व्हेमधून मिळालेली उत्तरे अशी :प्रश्न : २६ जानेवारी हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातोउत्तर : प्रजासत्ताक दिन : ९७ टक्के, स्वातंत्र्यदिन : ३ टक्के.
प्रश्न : दिल्लीमध्ये २६ जानेवारीचा मुख्य सोहळा कोठे होतो?उत्तर : लाल किल्ला : ४५ टक्के, राजपथ ३५ टक्के, राष्ट्रपती भवन : २० टक्के.
प्रश्न : दिल्लीतील मुख्य सोहळ्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते? उत्तर : राष्ट्रपती : ३८ टक्के , पंतप्रधान : ६२ टक्के.प्रश्न : भारताच्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत?उत्तर : तीन : ६८ टक्के, चार : ३२ टक्के.
प्रश्न : मुंबईमध्ये २६ जानेवारीचे मुख्य ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते?उत्तर : राज्यपाल : ३० टक्के, मुख्यमंत्री : ७० टक्के.
प्रश्न : भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये कोणते चिन्ह वापरण्यात आले आहे?उत्तर : अशोक चक्र : शंभर टक्के.
प्रश्न : कोल्हापूरमध्ये २६ जानेवारीचा मुख्य शासकीय कार्यक्रम कोठे होतो?उत्तर : शाहू स्टेडियम : ५५ टक्के, पोलिस ग्राऊंड : २८ टक्के, शिवाजी स्टेडियम : १७ टक्के.
प्रश्न : कोल्हापूरमधील कार्यक्रमात ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होेते?उत्तर : पालकमंत्री : ५८ टक्के, जिल्हाधिकारी २८ टक्के, आयुक्त : १२ टक्के, विशेष पोलीस महानिरीक्षक : २ टक्के.ध्वजारोहण कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित असता का?होय : ४० टक्के, नाही : ६० टक्के.