कोल्हापूर : काका, काकू, आपण कसे आहेत... आपली तब्येत कशी आहे..., काही अडचण आहे का...? असा आदराने विचारपूस करणारा, भावनेला हात घालणारा संवाद फोनद्वारे कानी पडल्याने ज्येष्ठ नागरिकही सुखावले. कोरोनामुळे घरात कोंडून घेण्याची वेळ आलेल्यांना आपुलकीचा आधार देणारे फोन जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून जात आहेत. या अभिनव उपक्रमामुळे कोरोनामुळे जीव मुठीत धरून बसलेल्या वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हस्य उमटले.
वयोवृद्ध व्यक्ती म्हटले की, त्यांना ऐकायला कमी येते, डोळ्याने कमी दिसते, अशा अवस्थेत अनेक जण त्यांची जागा अडगळीतच समजतात. युवा पिढीचा तर त्यांच्याशी संवाद संपलेलाच आहे. वृद्धापकाळाचे जीवन जगणाऱ्यांना आपुलकीचे दोन शब्दच पुरेसे असतात. त्यातच कोरोनाची भीती त्यांच्या मनात घर करून बसली. नकारात्मक माहिती वारंवार ऐकून, वाचून ते तणावात आहेत. अशा भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या ज्येष्ठांची परवड होऊ नये या उद्देशाने त्यांना आपुलकी दाखवणारा उपक्रम जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सुरू केला. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ७३ ज्येष्ठ नागरिक आहेत. रविवारपासून त्यांना दिलासा देणारा हा उपक्रम सुरू झाला आहे.
त्यांना पोलीस ठाण्यातून चौकशी करणारा, गोड शब्दात संवाद साधणारा, आपुलकीने तब्येतीची विचारपूस करणारा फोन जात आहे. त्यातून काळजी करू नका, वेळेत उपचार घेतल्याने कोरोना बरा होतोच. त्यामुळे घाबरून जाऊ नका, कोणत्याही वेळी मदतीसाठी आम्हाला ११२ नंबरला फोन करा, पोलीस आपल्याला सहकार्य करतील, असा विश्वास दिला जात आहे. त्यामुळे ज्येष्ठांचे चेहरे फुलले आहेत.
कोट...
घरचे काळजी घेतातच; पण बाहेरही कोणी तरी आपले काळजी करणारे आहे, असे वाटले. पोलीस ठाण्यातून फोन आल्यानंतर हायसे वाटले.
-आनंद इनामदार, साळोखेनगर, कोल्हापूर
कोट..
पोलीसही आमच्यासारख्या वृद्धांची चौकशी करतात, ऐकून समाधान वाटले. हेल्प पाहिजे का? अडचणी आहेत का? अशी विचारपूस करताना बरे वाटले.
-बापूसाहेब भोसले, शिवाजी पेठ, कोल्हापूर.