- ज्योती पाटील पाचगाव(कोल्हापूर) - शहरातील दीपसेवक सोसायटी आर.के.नगर (पाचगाव) या परिसरातील घराघरात मळीमिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यानं महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेकदा तक्रारी करुनदेखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे. याकडे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं तात्काळ लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी या परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.
आर.के.नगर येथील दीपसेवक सोसायटीमध्ये गेल्या वर्षभरापासून लोकांच्या घरात मळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. तसंच एकदिवस आड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच वैतागलेले आहेत. दुर्गंधीयुक्त पाण्याने अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. पुरावा म्हणून अशुद्ध पाणी बाटलीतून घेऊन अधिकाऱ्यांनाही दाखवले आहे. पण अद्याप नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सांगितले की त्यांच्याकडून उलट उत्तरं मिळतात, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.अपुऱ्या आणि मळीमिश्रित पाणीपुरवठ्याचे बिल मात्र वेळेत येत आहे. येथील लोकांनी बिले वेळेत भरुनसुद्धा त्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. अनेकांनी घरात पाणी शुद्ध करण्याचे यंत्र बसवली आहेत. पण त्या पाण्यालाही दुर्गंधी येते. त्यामुळे आता यासंदर्भात तक्रार करायची तरी कोणाकडे, असा प्रश्न येथील रहिवाशांनी पडला आहे.