कोल्हापूर : गुजरी कॉर्नर येथे रविवारी (दि. १८) विमनस्क अवस्थेत आढळलेल्या ‘देवकी’ नावाच्या निराधार तरुणीचे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या गीता हसूरकर व सीमा पाटील यांनी ‘एकटी’ संस्थेमध्ये पुनर्वसन केले.रविवारी सायंकाळी ७.३० च्या आसपास गुजरी कॉर्नर येथून हसूरकर आपल्या वाहनाने जात असताना अचानक त्यांच्यासमोर विमनस्क अवस्थेत असलेली साधारण अठरा वर्षांची असलेली एक तरुणी आली. त्यावेळी ती निर्वस्त्र होती. तिला पाहून हसूरकर यांचे मन बैचेन झाले. गाडीची काच बंद करून त्या पुढे जाऊ शकल्या असत्या, परंतु त्यांच्या अंतर्मनाला ते दृष्य बघवले नाही. हसूरकर गाडी थांबवून खाली उतरल्या. तिचा बाजूला पडलेला ड्रेस तिला घातला. तिला तिचे नाव, गाव, आदी माहिती विचारली असता ती काहीच बोलत नव्हती. म्हणून आसपास चौकशी केल्यावर त्यांना कळले की, तिचे नाव ‘देवकी’ असून गेल्या काही महिन्यांपासून ती शहरातील विविध भागांत अशा विमनस्क अवस्थेत फिरते आहे. कसबा बीड परिसरात तिचे घर आहे. लग्नही झालेले आहे; परंतु तिला घरातून हाकलून लावण्यात आले असावे, अशी अंदाजित माहिती त्यांना मिळाली. तेव्हा हसूरकर यांनी ‘अवनि’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्याशी संपर्क साधून ‘देवकी’संबंधी माहिती दिली. त्यांनी तिची जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नोंद करून, सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून तिला संस्थेत घेऊन यावयास सांगितले. सीमा पाटील व गीता हसूरकर यांनी मिळून ‘देवकी’चे कसेबसे मन वळवून देवकीची वैद्यकीय तपासणी करवून तिला ‘एकटी’ या संस्थेत दाखल केले. तिच्या या अवस्थेचे कारण जाणून घेऊन तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात येणार असल्याचे हसूरकर यांनी सांगितले.समाजात आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला व मुली निराधार अवस्थेत फिरताना दिसतात. त्यांना भेटून त्यांची स्थिती समजावून घेऊन त्यांना कोणत्याही संस्थेत दाखल करण्याचा प्रयत्न व्हायला हवा, अशी अपेक्षा गीता हसूरकर व सीमा पाटील यांनी व्यक्त केली.
निराधार ‘देवकी’स मिळाली मायेची ऊब
By admin | Published: September 21, 2016 12:37 AM