अशोक खाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककुंभोज : परस्पर सहकार्याशिवाय मानवी जीवनाचा विकास अशक्य आहे. उदरनिवार्हाचे साधन असणारी शेतीवाडी चांगली पिकावी आणि त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे या हेतूने सहकारमहर्र्षींनी पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात सहकार रुजविला. याच सहकाराच्या वाटेवरून जात असंख्य अडीअडचणींना तोंड देत काटेकोर नियोजन आणि पारदर्शी कारभाराच्या बळावर कुंभोज (ता.हातकणंगले) येथील परस्पर सहाय्यकारक सहकारी सेवा संस्थेने १०२ वर्षांच्या वाटचालीत सर्वोत्कृष्ट कारभार करून कुंभोज गावातील हजाराच्या आसपास सभासद शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.सन १९८४ नंतर वारणा नदी बारमाही वाहू लागताच वारणामाईच्या कुशीतील कर्मवीर आण्णांची जन्मभूमी असलेले हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गाव ऊसशेतीचे आगार बनून गेले. शेती आणि शेतकºयांच्या उन्नतीसाठी २३ मे १९१७ रोजी परस्पर सहाय्यकारी मंडळी अनलिमिटेड संस्थेची स्थापना झाली. नंतर संस्थेच्या इमारतीची पायाभरणी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याहस्ते झाली. ही संस्था अल्पावधीतच शेतकºयांचा आधारवड बनली. पुढे या संस्थेचे नामांतर परस्पर सहाय्यकारक सहकारी सेवा संस्था असे केले.सभासदांमध्ये काटकसर, स्वावलंबन व परस्पर सहकार्य वाढीस लावून त्यांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नती करणे हा संस्था स्थापनेमागचा मूळ हेतू. सहकाराचे अपुरे ज्ञान आणि व्यावसायिकतेचा अभाव यामुळे गावातील या पहिल्या सेवा संस्थेची सुरुवातीच्या २३ वर्षांतील प्रगतीची वाटचाल खडतर पण सभासदांच्या विश्वासास पात्र ठरणारी राहिली.१९४० ते १९८६ दरम्यान संस्थेच्या कारभारात शिथीलता आली. एकीकडे गावच्या शेतीचे बागायती क्षेत्र झपाट्याने वाढत असताना शेतकºयांची सुलभ पीककर्ज आणि रासायनिक खत उपलब्धतेची वाढती गरज ओळखून माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पाटील यांनी संस्थेच्या कारभारात स्वत: जातीनिशी लक्ष घातले. नि:स्पृहवृत्ती, राजकारणविरहित कारभार तसेच सभासदांत कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करीत पाटील यांनी संस्थेची सूत्रे हाती घेतल्यानंतर आजपर्यंतचा संस्थेचा ३२ वर्षांचा प्रगतीचा आलेख चढता तर राहिलाच किंबहुना संस्थेच्या प्रगतशील वाटचालीचा हा जणू सुवर्णकाळ ठरला आहे.सभासदांची गरज आणि त्याची पत पाहून पीककर्ज एकरी अडतीस हजार, खावटी कर्ज बावीस हजार, विशेष कर्ज पंचवीस हजार रुपये तर केडीसीच्या धोरणानुसार आणि सभासदांकडील परतफेडीच्या पात्रतेनुसार त्यास मध्यम मुदतीचे कर्ज वितरीत केले जाते. संस्था पातळीवर ९८ टक्के तर बँक पातळीवर १०० टक्के कर्जवसुली आहे.सभासदाभिमुख, पारदर्शी, काटकसरीच्या कारभाराने सभासदांची मने जिंकलेल्या संचालक मंडळास १०२ वर्षांच्या वाटचालीत एकाही निवडणुकीस सामोरे जावे लागले नाही. तब्बल शंभरी पार केलेल्या सेवा संस्थेची बिनविरोध निवडणुकीची परंपरा केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर सहकार क्षेत्रासमोर आदर्श निर्माण करणारी ठरली आहे.सभासद शेतकºयांच्या मागणीनुसार ७६ रासायनिक खतांची उत्पादने विक्रीस ठेवून संस्थेचा खतविभाग प्रतिवर्षी अडीच कोटी रपयांच्या उलाढालीद्वारे सुमारे आठ लाख रुपये नफा मिळवून देत आहे. तर संस्थेच्या धान्य विभागाचे कामकाजही अतिशय चोखपणे सुरू आहे. २९ जुलै २०१८ रोजी संस्थेचा शतकोत्तर महोत्सव कार्यक्रम खासदार राजू शेट्टी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अमल महाडिक, सतेज पाटील, माजी मंत्री विनय कोरे, प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, राजीव आवळे, माजी जि.प. अध्यक्ष डी. सी. पाटील, वारणा दूध संघाचे संचालक अरूण पाटील आदींच्या उपस्थितीत बाहुबली येथे दिमाखात पार पडला. याप्रसंगी संस्थेने सभासदांना शेअर्सच्या प्रमाणात ५ ते ६५ ग्रॅमची चांदीची नाणी भेट देऊन यथोचित सन्मान केला.सहकारवाढीच्या दृष्टीने सहकारी कायद्याचे पालन करत संस्थेने सभासदांमध्ये काटकसर स्वावलंबन, परस्पर सहकार्याची भावना वाढीस लावण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.
‘परस्पर सहाय्यकारक’ची बिनविरोध परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:28 AM