कोल्हापूर : महापालिका व नगरपालिका हद्दीत रस्त्यांवर अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन तपासणी करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सकाळी ७ ते ११ किराणा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु आहेत. या काळात व त्यानंतरही दिवसभर काहीतरी निमित्त काढून रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कायम आहे. त्याला चाप लावण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यात अजूनही रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. कोरोना चाचण्या वाढवल्यामुळे रुग्णसंख्येचा रोजचा आकडा दीड हजारच्या पुढे आहे. मृत्यूंची संख्याही अजून ४० च्या खाली यायला तयार नाही. त्यामुळेच प्रशासनाने १५ जूनपर्यंत निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय घेतला. असे असताना सकाळी ११ नंतर रस्त्यावरील वर्दळही कायम आहे. आता तर चौकाचौकातील पोलीस बंदोबस्त काहीसा शिथिल केला आहे. त्यामुळेही रस्त्यावरील वर्दळ वाढणार आहे. याची दखल घेत प्रशासनाने पुन्हा त्याबद्दल कडक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर शहर व नगरपालिका शहरात असे विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करून त्यांची जागीच अँटिजन तपासणी करण्यात येणार आहे. त्याच्या भितीने तरी लोक किमान काही बंधने पाळून घरात थांबतील, अशी प्रशासनाला आशा आहे.