ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे, अशा व्यक्तींना कोरोना झाला तर त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा व्यक्तींनासुद्धा कसला संशय येत नाही. तब्बेत ठणठणीत आहे, असे समजून या व्यक्ती बाजारात, सार्वजनिक रस्त्यावर फिरत असतात. आणि न कळत त्याच्या हातून कोरोनाचा संसर्ग वाढत जातो.
महानगरपालिकेच्या आराेग्य विभागाने कोरोनाचे सुपरस्प्रेडर असलेल्या भाजी, फळ विक्रेत्यांची कोरोनाची ॲन्टिजन चाचणी सुरू केली. त्यानंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी केली. त्यातूनही काही व्यक्ती कोरोना बाधित असल्याची बाब उघड झाली. त्यामुळे कोरोना किती विचित्र आजार आहे, हे दिसून येत आहे.
शुक्रवारपासून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा खासगी लक्झरी बस आणि रिक्षाचालकांकडे वळविला. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात दोन पथके तैनात करून सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत रिक्षाचालक, बसमधून येणारे प्रवासी अशा १३३ व्यक्तींची ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आठ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची बाब समोर आली. या सर्वांना तत्काळ कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. या मोहिमेत चार लक्झरी बसेस, १६ चारचाकी वाहनातील प्रवाशांचा तसेच लक्झरी बस बुकींग करणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही कोरोना चाचणी केलेल्यांमध्ये समावेश आहे.
कनान नगरात १०८ जणांची तपासणी-
महापालिकेच्या आरोग्य विभागाने कनान नगर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या १०८ व्यक्तींची ॲन्टिजन तपासणी केली, तेव्हा एक रुग्ण कोराेना बाधित आढळून आला. गेल्या वर्षी कनान नगर झोपडपट्टीत काही रुग्ण आढळल्याने तेथे मोठी घबराट निर्माण झाली होती, तसेच दाट वस्ती असल्याने प्रसार थांबविण्याचे एक आव्हान प्रशासनासमोर होते.
-शंका आली म्हणून चाचणी, घरातील चौघे बाधित -
कळंबा येथे वास्तव्यास असलेल्या एका ग्रामविकास अधिकाऱ्याला मनात केवळ शंका आली म्हणून त्याने मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ॲन्टिजन चाचणी करून घेतली. ते स्वत: बाधित होतेच, शिवाय त्यांची पत्नी, दोन मुलेही बाधित असल्याची बाब समोर आली. हिरवडे दुमाला येथील रहिवासी असल्याने त्या गावाच्या सरपंचांना त्याची माहिती देण्यात आली. कारण याच व्यक्तीचे दोन चुलतेही कोरोना बाधित झाले होते.
महावितरणमधील एका विद्युत निरीक्षकाची या ठिकाणी स्वॅब घेऊन चाचणी करण्यात आली, तेव्हा तोही कोरोनाबाधित आढळून आला. त्याची रवानगी डीओटीकडे करण्यात आली, तर त्याची माहिती हातकणंगले प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली.