उंदरवाडी (ता. कागल) येथे पाण्याच्या शोधात आलेला दहा गव्यांचा कळप कालव्यात पडून त्यातील एका गव्याचा मृत्यू झाला. कालव्यात गवे पडण्याची ही चार महिन्यांतील तिसरी घटना. त्यामुळे गव्यांसाठी उंदरवाडी येथील कालवा हा जीवघेणा स्पॉट ठरत आहे. गव्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभाग आणि पाटबंधारे विभागाने यासाठी विशेष उपाययोजना करून रँप व पाणवठे उभारावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
उंदरवाडी कालवा परिसरात मक्का व ऊस हे पीक मोठ्या प्रमाणात असते. तसेच दाट झाडी व कालव्याला उपलब्ध असणारे पाणी यामुळे परिसरात गव्यांची वर्दळ वाढली असल्याची चर्चा आहे. पाण्याच्या शोधात आलेले हे गवे कालव्यात पडतात आणि मग स्वत:च्या सुटकेसाठी त्यांना जीवघेणी कसरत करावी लागते.
सध्या कालव्याचे अस्तरीकरण झाल्याने गव्यांना कालव्यात पडल्यानंतर बाहेर पडताच येत नाही. उंदरवाडीजवळ लाकडी पुलाचा साकव असून त्याच्या बाजूला साधारणपणे काही भागाचे अस्तरीकरण करण्याचे राहिले आहे. नेमके हेच ठिकाण गव्यांसाठी तारणहार बनत आहे. यदाकदाचित गवे पडल्यानंतर हे ठिकाण गव्याकडून चुकलेच, तर किमान बोरवडेजवळील कालव्यापर्यंत तीन कि.मी. अंतर गव्यांना यावे लागेल. येथेही त्यांना बाहेर पडण्यासाठी अडचण आहे. त्यानंतर कुठेही गव्यांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नाही.
चौकट करणे -
"सरवडे ते उंदरवाडी कालव्यात गवे पडण्याची घटना सातत्याने घडत आहे. कालच अशा घटनेमध्ये एका गव्याला आपला जीव गमवावा लागला असून वन विभाग व पाटबंधारे विभागाने येथे पाणवठे उभे करावेत. ठराविक अंतरावर रँप बांधावेत..आता जे रँप आहेत ते गव्यांसाठी योग्य नाहीत"
- हिंदुराव परीट (पोलीस पाटील, उंदरवाडी )
फोटो ओळी -
उंदरवाडी येथील कालव्याचे अस्तरीकरण न झालेला हाच भाग गव्यांना बाहेर पडण्यासाठी मदतीचा ठरत आहे.(छाया - रमेश वारके )