कोल्हापूर : शिवजयंती महोत्सवानिमित्त कोल्हापुरात शिवमय वातावरण झाले असून, रविवारी संंयुक्त राजारामपुरी, संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्था, संयुक्त फुलेवाडी तरुण मंडळ यांनी शहरातून भगवे झेंडे घेऊन ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’ असा जयघोष करत जल्लोषी वातावरणात दुचाकीवरून रॅली काढल्या. याशिवाय मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, रंकाळा टॉवर, आदी संपूर्ण शहरात विविध कार्यक्रम घेतले. अनेकांनी दुचाकी रॅलीतून परिसरातील मंडळांना बुधवारी होणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे पानसुपारी देऊन निमंत्रण दिले.बुधवारी होणाºया शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात गेले तीन दिवस शिवमहोत्सव सुरू असून रविवारी सायंकाळी संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्थेच्यावतीने ‘जय भवानी-जय शिवाजी’ असा जल्लोष करत ही रॅली तोरस्कर चौकातून सुरू झाली. रॅली शिवाजी चौक, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, दिलबहार तालीम, मिरजकर तिकटी चौक, महाद्वार रोडमार्गे पुन्हा तोरस्कर चौकात आली. रॅलीमध्ये भगवे झेंडे फडफडत होते. यामध्ये माजी नगरसेवक धनंजय सावंत, राहुल घाटगे, अभिजित बुकशेटे, सचिन क्षीरसागर, अक्षय शेडे, प्रवीण चौगुले, संदीप देसाई, संदीप राणे, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, कुणाल भोसले, राहुल कुंडले, उदय कोलपे, पिंटू स्वामी आदींचा समावेश होता.संयुक्त फुलेवाडीच्यावतीने रविवारी सकाळी दत्त मंदिर चौकात शिवमहलात शिवमूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर भगवे झेंडे फडकत फुलेवाडीतून दुचाकी रॅली काढली. यामध्ये नगरसेवक राहुल माने, राजू मोरे, मानसिंग पाटील, सागर घाटगे, प्रशांत घोरपडे, युवराज पाटील, गौरव मोरे, विश्वास कळके, माजी नगरसेवक किरण दरवान, सरपंच संदीप पाटील, राहुल घोरपडे, अजित यादव, राजेंद्र पाटील आदी सहभागी झाले होते. याशिवाय मिरजकर तिकटी चौकातील संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्यावतीने सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. यावेळी तीन दिवस चालणाºया खाद्यमहोत्सवाचे उद्घाटन केले तर रंकाळा टॉवर येथे क्रांती तरुण मंडळाच्यावतीने उभारलेल्या आकर्षक शिवतीर्थ महलाची भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी सायंकाळी सारे शहर लोटले होते.‘अवनि’ला मदतीचा हात...शिवजयंती सोहळ्यानिमित्त महाद्वार रोडवरील श्री दत्त महाराज तालीम मंडळातर्फे रविवारी ‘अवनि’ या संस्थेला शिवकल्याण योजनेंतर्गत भांडी, कपडे, धान्य असे साहित्य भेट दिले. त्यानंतर ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक गाथा’ हा लोकनृत्याचा बहारदार कार्यक्रम रात्री झाला. याठिकाणी शिवभक्तांची गर्दी होती. अवनि या संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांना अॅड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते ही मदत दिली. आज, सोमवारी पारंपरिक लोककला स्पर्धा सायंकाळी सात वाजता होणार आहे तर उद्या, मंगळवारी शिवजन्मकाळ सोहळा व हळदी-कुंकू समारंभ सकाळी ११ वाजता आहे.