कोल्हापूर : राज्य शासनाच्या पणन विभागाने मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतंर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बाजार समितीची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण, वाढलेले खर्च आणि घटलेल्या उत्पन्नामुळे अगोदरच समित्यांची अवस्था नाजूक आहे. साडेतीन तालुक्यांची ‘गडहिंग्लज’ समिती तोट्यात आहे. तालुक्याच्या ठिकाणी समित्या केल्या, तर शेतीमाल आणायचा कोठून? आजरा, गगनबावडा, शाहूवाडीसारख्या दुर्गम तालुक्यांत भाताशिवाय फार काही पिकत नाही, तिथे उत्पन्नाचे साधन काय? शासनाच्या या निर्णयाने समित्यांचा बुडता पाय अधिकच खोलात जाणार आहे.शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट समितीत घेऊन जाता यावा, यासाठी तालुक्याच्या ठिकाणी बाजार समित्या करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ६९ ठिकाणी समित्या नाहीत. राज्यात बहुतांशी समित्या या तालुक्याच्या ठिकाणीच आहेत. पण, त्या तालुक्यांचा विस्तार, विविध पिके यामुळे त्या समित्या चालल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक स्थिती वेगळी आहे, डोंगराळ व छोट्या तालुके आहेत, येथे भात, नाचणी व ऊसाचे उत्पादन घेतले जाते. भाजीपाला फार तुरळक प्रमाणात घेतला जातो, त्यामुळे समित्यांमध्ये विक्रीला काय येणार, याचा अभ्यास होण्याची गरज आहे.
प्रक्रिया उद्योगासाठी शासन प्रयत्न गरजेचा
बाजार समित्या या केवळ सेसवर चालू आहेत. एकीकडे उत्पन्न वाढत असताना, शेतीमाल कमी होऊ लागल्याने आतबट्यात येत आहेत. समित्यांच्या आवारात शिल्लक जागेत शासनाने प्रक्रिया उद्याेग उभारणीसाठी मदत केली, तर समित्यांचे उत्पन्न वाढीस मदत होणार आहे.बाजार समित्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत
- कोल्हापूर (उपबाजार - मलकापूर, कागल) : भाजीपाला, गूळ, कांदा-बटाटा, कडधान्य, फळे मार्केट
- गडहिंग्लज (उपबाजार- चंदगड) : मिरची, भाजीपाला
- पेठवडगाव : जनावरांचा बाजार, भाजीपाला, सोयाबीन
- जयसिंगपूर : भाजीपाला, तंबाखू, वजनकाटा, गोडावून
तालुक्यांची भाैगोलिक परिस्थिती व शेतीमालाचे उत्पादन पाहिले तर तालुक्याला बाजार समिती ही संकल्पना सध्या तरी योग्य वाटत नाही. - ॲड. प्रकाश देसाई (सभापती, कोल्हापूर बाजार समिती)
जिल्ह्यातील चार बाजार समित्यांची आर्थिक स्थिती
बाजार समिती | कार्यक्षेत्रातील तालुके | उत्पन्न | खर्च |
काेल्हापूर | करवीर, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, कागल (निम्मा) | १९ कोटी | १६.५० कोटी |
जयसिंगपूर | शिरोळ | २ कोटी | १.२५ कोटी |
पेठवडगाव | हातकणंगले | ३.७५ कोटी | ३.६० कोटी |
गडहिंग्लज | गडहिंग्लज, चंदगड, आजरा व कागल (निम्मा) | ५३.२१ लाख | ९०.६२ लाख |