दीपक मेटील - सडोली खालसा-- पाण्याच्या अतिवापरामुळे शेती नापीक होऊन उत्पादन क्षमता घटत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. उत्पादन वाढीसाठी व पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी कारभारवाडी (ता. करवीर) या गावातील शिवाजी पाटील पाणीपुरवठा संस्थेने सर्व शेती ठिबक सिंचनाखाली आणली आहे. त्यामुळे पाण्याची ४० टक्के बचत, तर उत्पादनात ३० टक्के वाढ होणार आहे. हा ठिबक सिंचन प्रकल्प संपूर्ण संगणकीकृत असल्याने पिकांना पाणी, औषधे, खते एकाच क्लिकवर मिळणार आहेत.कारभारवाडी, सडोली (खालसा) गावातील उपगाव येथील लोकसंख्या ४५० असून, ६० कुटुंबे आहेत. गावासाठी १०५ हेक्टर इतके जमिनीचे क्षेत्र असून ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफुल व अन्य पिके घेतली जातात. पिकांना भोगावती नदीवरून संस्थेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. योग्य नियोजनामुळे या संस्थेचा खर्च वजा जाता जिल्हा बॅँकेत ठेवी आहेत. पाण्याचा अतिवापर व लोडशेडिंग या कारणाने योग्य उत्पादन मिळत नसल्यामुळे गावातील तरुण शेतकऱ्यांनी इफको खत कंपनी, कृषी विभाग यांच्या माध्यमातून ठिबक सिंचनचा एकमुखी निर्णय घेतला.या प्रकल्पासाठी एकरी एक लाख रुपये खर्च येणार आहे. नाबार्ड व कोल्हापूर जिल्हा बॅँक यांच्या माध्यमातून सखाराम पाटील, हरी रामजी पाटील, भैरवनाथ कारभारवाडी, भैरवनाथ गाडेगोंडवाडी या विकास संस्थांकडून ७२ लाख रुपये कर्ज मिळाले आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे ४० टक्के पाणीवापर कमी व ३० टक्के उत्पादन वाढणार आहे. ‘एकी हेच बळ’, या म्हणीप्रमाणे कारभारवाडी गावचा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे.या उपक्रमासाठी इफको खत कंपनी, केडीसीसी बॅँक, नाबार्ड बॅँक, कृषी विभाग, भोगावती कारखाना, विकास संस्था यांचे सहकार्य लाभले आहे.एकरी ४१ हजार रुपयांचे अनुदानया प्रकल्पासाठी एकरी एक लाख खर्च येणार आहे, तर महाराष्ट्र राज्य १५ हजार, केंद्र सरकार १५ हजार, भोगावती साखर कारखाना सात हजार, इफको खत कंपनी चार हजार, असे एकूण ४१ हजार प्रति एकर अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.भोगावती साखर कारखान्याने ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी सात हजार रुपये अनुदान दिले असून, शासनाने शंभर टक्के अनुदान देण्याची गरज आहे, तरच पाणी वाचविण्यासाठी सर्व शेतकरी प्रयत्न करतील.- धैर्यशील पाटील (कौलवकर), अध्यक्ष, भोगावती साखर कारखाना.शेतीला कृषी तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती किफायतशीर ठरेल. शेती आदर्श व्यवसाय ठरावा, यासाठी शेतकऱ्यांनी वाडीची सर्व शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.- प्रा. नेताजी पाटीलअध्यक्ष, कै. शिवाजी पाटील पाणीपुरवठा संस्था.
कारभारवाडीची सर्व शेती ‘ठिबक’खाली
By admin | Published: January 30, 2015 9:52 PM