येथील ग्रामपंचायतमध्ये ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपसरपंच शरद धुळूगडे हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी अमोल शिवई म्हणाले की,आम्ही त्या योजने संबंधित कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांना नदीकाठावर येऊ देणार नाही. अण्णासो चौगुले म्हणाले की, हुपरी येथे झालेली बैठक ही येथील जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. तेथील बैठकीत असणाऱ्या आमच्या लोकांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. मात्र त्या लोकांनी मीडियासमोर त्यांची एकच बाजू पुढे आणली. इरगोंडा टेळे म्हणाले की, राधानगरी धरण काळम्मावाडी धरणापूर्वी २५ ते ३० वर्षे झाले आहे. आम्ही त्यावेळी कोरड्या नदीच्या पात्रात, खड्डे काढून पाणी मिळवत होतो. तेव्हा पंचगंगा काठावरील नागरिकांना का वाटले नाही की, दुधगंगा काठावरील लोकांना पाणी द्यावे.
युवराज पाटील म्हणाले की, पंचगंगा नदीकाठावरील ४२ गावे नदीचे पाणी पितात, मग इचलकरंजीकरांनाच ते प्रदूषित का वाटते. त्यांनीच मोठ्या प्रमाणात पंचगंगा प्रदूषत केली, ते पाणी इचलकरंजी खालील भागातील लोक पीत आहेत. मग इचलकरंजीकरांनाच वेगळा न्याय कशासाठी असा सवाल केला.
या पत्रकार परिषदेस अण्णासो पाटील,शिवाजी लगारे,सुरेश घाटे,दिनकर लगारे, सुनील पार्वते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : शासनाने दूधगंगा नदीकाठावरील ग्रामस्थांना विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र कोणाच्या तर हितासाठी परस्पर निर्णय घेण्यात आला आणि लाखो लोकांचा विश्वासघात केला आहे. त्याविरोधात लवकरच दूधगंगा नदीकाठावरील सर्व गावे एकत्रित येऊन उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.