गडहिंग्लज : देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशा बातम्या प्रसारमाध्यमात येत आहेत. ते दुसऱ्यांदा राज्याचे नेतृत्व करतील. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हे देशात अव्वल राज्य होईल आणि राज्याची अर्थव्यवस्था देशात तिसऱ्या क्रमांकावर येईल, असा विश्वास माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित विजयोत्सव आणि बांधकाम कामगारांना भांडीसंच वाटपप्रसंगी ते बोलत होते. लाडक्या बहिणी आणि बांधकाम कामगार हेच विधानसभा निवडणुकीत खरे ‘गेम चेंजर’ ठरले, असेही त्यांनी सांगितले.मुश्रीफ म्हणाले, हिंजवडीप्रमाणे कोल्हापूर येथे आयटी पार्क करण्याचा आपला प्रयत्न आहे. गडहिंग्लजमध्ये बेघरांसाठी ३ हजार घरकुले, उपजिल्हा रुग्णालयात ‘एम.आर.आय’ सुविधा, एमआयडीसी नवे उद्योग व शहरात सुसज्ज फुटबॉल स्टेडिअम तयार करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. नगरपालिकेची एकहाती सत्ता दिल्यास गडहिंग्लज राज्यातील अव्वल शहर बनवू.यावेळी सतीश पाटील, रमेश रिंगणे, शिवाजी भुकेले यांचीही भाषणे झाली. महेश सलवादे यांनी स्वागत केले. अमर मांगले यांनी आभार मानले.
‘ऑडिओ क्लिप’ वाजवलीजनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी निवडणुकीच्या प्रचारात मुश्रीफांवर केलेल्या टीकेचा किरण कदम, नरेंद्र भद्रापूर, सिद्धार्थ बन्ने, गुंड्या पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. लोकसभेच्या प्रचारातील एका संभाषणाची ‘ऑडिओ क्लिपही’ माइकवर वाजवून दाखवली.
मुश्रीफांनी ‘जद’ फोडला नाही४ वर्षे आम्हाला खूप त्रास झाला. त्याबाबत मुश्रीफ यांच्याशी वेळोवेळी चर्चाही केली; परंतु तुम्ही तिथेच राहा, असे त्यांनी सांगितले होते. त्रासाला कंटाळूनच आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुश्रीफांनी जनता दल फोडल्याचा आरोप खोटा आहे, असा खुलासा माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे यांनी केला.
माझे रेकॉर्ड मोडू शकणार नाही !परमेश्वर व नियतीची साथ आणि सर्वसामान्यांच्या आशीर्वादामुळेच आजवर कुणीही माझा पराभव करू शकला नाही. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यानंतर सहा वेळा आमदार होण्याचा विक्रम आपण केला. १९ वर्षे मंत्री होतो, यावेळीही चांगले खाते नक्कीच मिळेल. भविष्यातदेखील कुणी माझे रेकॉर्ड मोडू शकणार नाही, असे काम करेन, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
कुणाची चवली-पावली नाही!गेल्या वेळी एका पक्ष्याच्या पाठिंब्यामुळे गडहिंग्लज शहरात १७०० मतांची आघाडी मिळाली होती. यावेळी ९०० मते जादा मिळाली, भाजपा, शिंदेसेना, रिपब्लिकन पक्ष व महाडीक युवा शक्ती यांच्यामुळेच हे शक्य झाले, यात कुणाची चवली-पावली नाही, असा टोला मुश्रीफ यांनी नामोल्लेख टाळून जनता दलाला हाणला.