कोल्हापूर : मजुरीसाठी गिरगाव (ता. करवीर) येथे येऊन राहिलेल्या धुळे जिल्ह्यातील एका अल्पवयीन विवाहितेची बुधवारी (दि. ८) सीपीआरमध्ये प्रसूती झाली. याबाबत पीडित विवाहितेचा पती भैरू आहिरे (मूळ रा. जातोडे, ता. सिंदखेडा, जि. धुळे) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार इस्पुर्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.इस्पुर्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील एक दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून मजुरीसाठी गिरगाव येथे राहत आहे. मंगळवारी (दि. ७) सकाळी पोटात दुखू लागल्याने पत्नीला गिरगाव ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. बुधवारी दुपारी पुढील उपचारासाठी तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्याचवेळी प्रसूती होऊन तिने स्त्री-अर्भकास जन्म दिला.यावेळी तिच्याकडील आधार कार्डची पडताळणी करताना तिचे वय १३ वर्षे तीन महिने १९ दिवस असल्याचे स्पष्ट झाले. अल्पवयीन मुलीशी लग्न करून अर्भक जन्मास घालण्यासाठी भाग पाडल्याबद्दल भैरू आहिरे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती इस्पुर्ली पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.
अल्पवयीन विवाहितेची कोल्हापुरातील सीपीआरमध्ये प्रसूती, पतीवर गुन्हा दाखल; दाम्पत्य धुळ्याचे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 11:50 AM