लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथे प्रलंबित असलेल्या भुयारी गटार ठेकेदाराच्या मुदतवाढीच्या अर्जाबाबत पुनर्विचार करावा, असे आवाहन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. विधानसभा भवनामध्ये मक्तेदाराने अपील केलेल्या अर्जाबाबत बुधवारी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीवेळी ते बोलत होते.
इचलकरंजी शहरामध्ये केंद्र सरकारच्या युआयडीएसएसएमटी या योजनेंतर्गत भुयारी गटार राबविण्यात येत आहे. सन २०१४ साली केआयपीएल व्हिस्टाकोअर इन्फ्रा प्रोजेक्टला मंजुरी मिळाली. या कंपनीच्या ठेकेदाराने वेळेवर काम पूर्ण न केल्याने ही योजना रखडली. वारंवार सूचना करूनही काम होत नसल्याने त्या ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावून त्यास काळ्या यादीत टाकण्यात आले.
दरम्यान, ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने मुदतवाढीसाठी नगरपालिकेकडे अर्ज करण्याचे निर्देश दिले. परंतु नगरपालिकेच्या सर्वसाधारण तो अर्ज फेटाळून लावला. या पार्श्वभूमीवर ठेकेदार उत्कर्ष पाटील यांनी मंत्री तनपुरे यांच्याकडे अपिल दाखल केले.