कोल्हापूर : सत्ताधाऱ्यांचा हे राम ते जय श्रीरामपर्यंतचा प्रवास समजून घेतला पाहिजे, आज जर आमच्या हाती लेखणी दिली तर आम्ही संविधान लिहूया, तलवार दिलीत तर भीमा कोरेगाव करूया अशाही संतप्त भावना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी गुरुवारी येथे व्यक्त केल्या.भाकप, श्रमिक प्रतिष्ठान आणि आयटकतर्फे शहीद गोविंद पानसरे शहीद दिनानिमित्त शाहू स्मारकमध्ये ''पानसरेंना न्याय कधी'' या विषयावर ते बोलत होते. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी होते. पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.कोळसे-पाटील म्हणाले, गोविंद पानसरे हे ज्ञानेश्वरांच्या भाषेत समजावून सांगतात आम्ही तुकोबांच्या. परंतु सत्ताधाऱ्यांचे षड्यंत्र समजावून सांगण्यात आमची हयात जात आहे. विचाराला विचाराने उत्तर द्या हे अण्णांचे सांगणे होते. गोळवलकर, सावरकर, टिळक वाचा, त्यातील लिखाण विषारी आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा खून हे त्याचे द्योतक आहे. खून, दंगली, मशिदी पाडणे हे त्यांच्या या विषारी प्रसाराचे दाखले आहेत. यात देशातील सर्व संवैधानिक संस्थांना हाताशी धरले. स्मिता पानसरे म्हणाल्या, आम्ही सारे पानसरे म्हणून अभिनिवेश बाजूला ठेवून अण्णांनी मांडलेला शत्रू मित्र विवेक जोपासला पाहिजे. प्रा. डॉ. चौसाळकर म्हणाले, पानसरे यांचा खून होऊन १० वर्षे झाली, तरी गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही. आपली न्यायव्यवस्था त्यांना योग्य न्याय देऊ शकत नाही. पानसरे यांनी जनतेची चळवळ उभी केली, ती पुढे नेली पाहिजे. मानवजातीच्या मुक्तीसाठी संघर्ष करा.
करकरेंच्या खुनाचा कट गांधींजींपेक्षा भयंकरकरकरे यांच्या खुनामागेही हीच शक्ती होती. गांधींना मारण्याचा कट रचला त्यापेक्षाही अक्कलहुशारीने त्यांनी एकविसाव्या शतकात करकरे यांना मारण्याचा कट रचला. हा भयंकर कट पानसरे व्याख्यानातून उलगडत होते, म्हणूनच त्यांची हत्या झाली असे कोळसे-पाटील यांनी सांगितले.
घाबरून घरी मरण्यापेक्षा लढत मरावयाच्या ४७ व्या वर्षीच मी घाबरणार नाही अशी शपथ घेतली होती. त्यामुळे देशाची सर्वांत मोठा शत्रू आरएसएस, विषारी विचारांची प्रेरणा देणारा ब्राह्मणवाद, त्याला घाबरून घरी राहून एसीत मरायचे की रस्त्यावर उतरून लढत लढत मरायचे याचा निर्णय घ्यायची वेळ आली आहे असा सल्ला कोळसे-पाटील यांनी दिला.