कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ लांबल्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक मंडळींची प्रचंड कोंडी झाली आहे. निवडणूक नेमकी कधी होणार? याची स्पष्टता नसल्याने ‘धड तयारीही करता येईना आणि शांतही बसता येईना’ अशी अवस्था इच्छुकांची झाली आहे. पालिकेची निवडणूक प्रथमच लढविणाऱ्या मंडळींनी निवडणूक होईल, या अपेक्षेने त्यांचे हात सैल सोडले; परंतु आता निवडणूक लांबत चालल्याने तसेच खर्चही परवडत नसल्याने त्यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे.कोल्हापूर महानगरपालिकेसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० ला संपली. मुदत संपून दोन वर्षे होऊन गेली. निवडणूक होणार या अपेक्षेने जानेवारी २०२० पासून माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनी जोरदार पेरणी सुरू केली होती; परंतु कोरोनाची महामारी आली आणि निवडणूक बेमुदत लांबली. त्याही परिस्थितीत इच्छुक मंडळीनी मतदारांना हरप्रकारे मदत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. वर्षभर संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र इच्छुकांनी सामाजिक काम करणे सोडून दिले.निवडणूक लढवायची म्हटले की, भागातील मंडळांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यापासून ते वैयक्तिक अडीअडचणीला धावून जाण्यापर्यंत प्रयोग करावे लागतात. नव्याने निवडणूक लढविणाऱ्यांनी शक्य होईल तेवढे काम केले. कोणतेही काम करायचे म्हटले, उपक्रम राबवायचा म्हटला की त्याला पैसे लागतात; पण पैसे घालूनही निवडणूक लागत नाही म्हटल्यावर मात्र त्यांनी आपले हात आखडते घेतले आहेत. अनेक इच्छुकांनी आता निवडणूक लागू दे, प्रभाग जाहीर होऊ देत, मग पुढचं बघू, असे म्हणून गप्प बसणे पसंत केले आहे.दैनंदिन कामासाठी ससेमिरा..वर्षानुवर्षे निवडणूक लढविणाऱ्या माजी नगरसेवक आणि ज्यांचा प्रभागातून सततचा संपर्क आहे, अशा मंडळींना मात्र नागरिक शांत बसून देत नाहीत. त्यांच्याकडे पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता यासंबंधीच्या तक्रारी केल्या जात आहेत. मंडळांना वर्गणी मागितली जात आहे. नगरसेवक नसतानाही त्यांना ही कामे मुकाट्याने करावी लागत आहेत. कारण उद्या भविष्यात कधी निवडणूक जाहीर झालीच तर पुन्हा त्यांच्या दारात जावे लागणार आहे. म्हणून मतदारांना दुखावण्याचा कोणी प्रयत्न करताना दिसत नाही.
धड तयारीही करता येईना अन् शांतही बसता येईना, महापालिका निवडणूक लांबणीमुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 11:46 AM