कोल्हापूर : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक तरुण बेरोजगार झाले. त्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेअर बाजारामधील रिटेल अर्थात वैयक्तिक गुंतवणुकीकडे तरुणाईचा कल वाढला. याच्यासाठी जादा रॅम, रोम असलेला गतिमान ५-जी मोबाइल फोन खरेदीचाही वेग वाढला. या तरुणाईच्या नव्या ट्रेंडमुळे कोल्हापुरात महिन्याकाठी नवोदित गुंतवणूकदारांकडून २०० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होत आहे. याशिवाय मोबाइल विक्रीतून महिन्याकाठी ५० कोटींची उलाढाल होते, ती वेगळीच.
कोरोना संसर्गाच्या सलग दोन लाटांनंतर अनेक कंपन्यांनी नोकरकपात केल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले. नोकरी सोडल्यानंतर आलेल्या रकमेतून अनेकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली. यासाठी विविध ब्रोकर्स कंपन्यांनी मोबाइल ॲपद्वारे अगदी विनाशुल्क डिमॅटसारखे खाते खोलण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे अगदी कमीत कमी रुपये दहा ते लाखो रुपयांपर्यंतची गुंतवणूक या ॲपद्वारे तरुणाईला सहजरीत्या करता येऊ लागली. गुंतवणुकीचा योग्य अभ्यास न करता अनेकांनी आलेल्या रकमेची गुंतवणूक केली.
नवोदितांना ही गुंतवणूक करून प्रथमदर्शनी चांगला परतावा मिळाला. त्यानंतर बाजार जसा पूर्ववत होऊ लागला तसा नवोदित रिटेलर गुंतवणूकदारांना फटका बसू लागला आहे. तरीसुद्धा गुंतवणुकीचा हा वेग काही केल्या कमी होत नाही. या गुंतवणुकीसाठी लागणारे मोबाइल, टॅब, स्मार्ट टीव्हीसारख्या गॅझेटची विक्रीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली. कारण या बाजारात होणारी उलाढाल मायक्रो सेकंद होते. त्याचे निर्देश टिपण्यासाठी तितक्याच तोडीचे गॅझेट हवे म्हणून अनेकांनी जादा वेगवान रॅम, रोम असलेले ५-जी मोबाइल खरेदीचा वेग वाढविला. त्यामुळे दोन्ही क्षेत्रांतील उलाढाल वाढली. कोल्हापूरचा विचार करता चांगल्या दर्जाच्या मोबाइल खरेदीचा वेग वाढला. त्यामुळे महिन्याकाठी ५० कोटींहून अधिकची उलाढाल या क्षेत्रात होऊ लागली आहे, तर नवोदित (रिटेल) शेअर बाजारातही २०० कोटींची उलाढाल होऊ लागली आहे. हा नवा ट्रेंड बाजारात मोठ्या प्रमाणात रुजू लागल्यामुळे अनेकांच्या मोबाइलमध्ये व्हाॅटस्ॲप, ट्विटरसह विविध ब्रोकरेज कंपन्यांची ॲप दिसू लागली आहेत.
सध्याच्या तेजीचा फायदा घेत फक्त ब्रँड व्हॅल्यूच्या जोरावर अनेक कंपन्या आयपीओ आणत आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी आमिषाला बळी न पडता संपूर्ण अभ्यास असल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये. नवीन गुंतवणूकदारांनी फक्त प्रस्थापित कंपन्यांमध्ये अथवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. - सी. ए. दीपेश गुंदेशा
किमान १५ हजारांच्या वरील किमतीचा व उत्तम पिक्चर क्वालिटी असलेला गतिमान असा मोबाइल, एअर बड, वायरलेस हेडफोन, गेमिंग हेड फोन, नेट बँड, स्मार्ट वाॅच (आरोग्याची देखभाल करण्यासाठी) अशा ॲक्सेसरीजची खरेदी वाढली आहे. - घनश्याम डिन्नी, मार्केटिंग हेड, एस. एस. मोबाइल्स