जयसिंगपूर : देशामध्ये वाढत चाललेल्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढू लागलेला आहे. भीषण महागाई व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक व व्यापार क्षेत्रामध्ये प्रचंड मंदी आलेली आहे. या सर्व गोष्टीस केंद्र सरकारचे चुकीचे व धरसोडीचे धोरण कारणीभूत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.दिल्ली येथील जंतर-मंतर येथे रविवारी राष्ट्रीय रोजगार निती कायदा करण्याबाबत सुरू असलेल्या रोजगार आंदोलनावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, देशामध्ये प्रत्येक रिकाम्या हाताला काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे. देशामध्ये वाढत असलेल्या बेरोजगारीबाबत केंद्र सरकारला गांभीर्य नसून, मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होऊन रोजगारनिर्मिती धोक्यात येऊन बेरोजगारी वाढू लागली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
आंदोलनास आम आदमी पक्षाचे दिल्लीचे राज्याचे पर्यावरणमंत्री गोपाळ राय, राज्यसभेचे खासदार संजय सिंग, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग, किसान संघर्ष मजदूर समितीचे गुरूनाम चढोणी यांच्यासह देशातील विविध पक्ष, शेतकरी संघटना, कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
युवा वर्ग शेतीपासून अलिप्त होऊ लागला
लॉकडाऊनच्या काळात रोजगार निर्मिती ठप्प होती. जवळपास अडीच कोटी लोक बेरोजगार झाले. मात्र, शेती क्षेत्राने नवीन ४० लाख रोजगारनिर्मिती केली. देशात सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या शेती क्षेत्रात पिकांना किमान आधारभूत किंमत मिळत नसल्याने व केंद्र शाश्वत धोरण नसल्याने युवा वर्ग शेतीपासून अलिप्त होऊ लागला असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.