राजेंद्र पाटील
भोगावती: स्वतःच्या शेतातील तुटून गेलेल्या उसाचा पाला पेटवत असताना उग्ररूप धारण केलेल्या आगीत मेंढपाळाच्या बकऱ्यांना वाचवता वाचता शेतकऱ्याचा मात्र घोरपडून मृत्यू झाला आहे. बेले (ता. करवीर)येथील पांडुरंग भाऊ पाटील (वय ८०)असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
पांडुरंग पाटील हे गावातील त्यांच्या 'छतरी' या शेतात उसाचा पाला पेटविण्यासाठी आज सायंकाळी पाच वाजता गेले होते.पाला पेटवत असताना शेताच्या सर्व बाजूनी आग लागून उग्ररूप धारण केले.त्यांच्या शेताच्या शेजारील शेतात मेंढरे बसवली होती.आग तिकडे जाऊन काही अनर्थ घडू नये म्हणून त्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घातला आणि ती आग विझवली मात्र त्या जळातून त्यांना बाहेर पडता आले नाही.त्यामध्ये त्यांचा होरपळून मृत्य झाला.शेताकडे गेलेल्या दुसऱ्या एका शेतकऱ्याने ही दुर्घटना पाहिली त्यांनी तात्काळ गावातील लोकांना घटनेची माहिती दिली व पांडुरंग पाटील यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.या अपघाताची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पांडुरंग पाटील हे गावातील प्रगतशील शेतकरी होते.अतिशय कष्टातून त्यांनी संसार उभा केला होता.त्यांच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्यात दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.