रवींद्र येसादे, भादवण: शेतात पाला - पाचोळा एकत्र करून जाळण्यासाठी गेलेल्या चिमणे (ता. आजरा) येथील ह भ प विठोबा भिमराव नादवडेकर (वय ८३) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी , विठोबा नादवडेकर सकाळी दहा वाजता चिमणे - झुलपेवाडी रोडवर झरा नावाच्या शेतात पाला - पाचोळा गोळा करण्यासाठी गेले होते. पाला पाजोळा गोळा करून झालेवर त्यांनी कचरा पेटवण्यास सुरुवात केली. बाराच्या सुमारास कडक ऊन व वारा यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. नादवडेकर यांनी शेजारी असणाऱ्या घराला आग लागेल म्हणून ते आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने नादवडेकर हे कासावीस झाले होते.
नादवडेकर हे पायाने अंपग होते. त्यामुळे त्यांना आगीपासून सुटका करता आले नाही. त्यांच्या कपड्यांना आग लागल्याने त्यांचा जागीच होरपळून दुर्देवी मृत्यू झाला.दुपारी एकच्या सुमारास रस्त्यावरून जा - ये करणाऱ्या शेतकऱ्यांना आग पेटत असल्याचे दिसले असता बाजूला धोंडीबा नादवडेकर आगीत १०० टक्के भाजले होते. नादवडेकर यांचे पश्चात एक विवाहीत मुलगी आहे. रात्री उशिरा शेतात अत्यंसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसांत झाली नव्हती.