कोल्हापूर : एकीकडे लोकशाही, स्वाभिमानाची ग्वाही द्यायची आणि ज्यांनी तुमच्या सोबत उभी हयात घालविली त्यांच्यावरच बोलायचे, साहेब तुम्ही जीव द्यायला सांगितला असता तर दिला असता, मात्र काही जणांचे मतदारसंघ सांभाळायचे म्हणून असा दुर्दैवी निर्णय घेतला, अशी टीका कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. अल्पसंख्याक समाजातील जन्माला येऊनही हसन मुश्रीफ यांनी संगमरवरी राममंदिर बांधल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तरदायित्व सभेत ते बाेलत हाेते. मंत्री मुंडे म्हणाले, कोल्हापुरात येऊन काहींनी आमच्यावर टीका केली, त्यांना उत्तर देण्यासाठी नाहीतर शरद पवार यांच्या विचारांचे उत्तरदायित्व सांगण्यासाठीच ही सभा घेतली आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन केलेल्या कामांमुळेच अजित पवार यांची विकास पुरुष म्हणून ओळख निर्माण झाली, आता महाराष्ट्रातील जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहता लोकनेता म्हणून शिक्कामोर्तब झाला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीत सोबत जाण्याचा निर्णय आमचा सामुदायिक होता. कोल्हापुरात महायुतीचे पाच आमदार नाहीतर सर्व दहा आमदार आणि महाराष्ट्रात सर्वच्या सर्व ४८ खासदार निवडून आणायचे आहेत. मापात पाप करायचे नाही, असा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय धुमसत आहे, मात्र कोणत्याही समाजावर अन्याय होईल, असा निर्णय न घेता मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घ्यावी. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र यावे. राज्यात दुफळी निर्माण करू नका, महाराष्ट्र अशक्त होता कामा नये याची काळजी घ्या.वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून सीपीआरमध्ये कॅन्सर हॉस्पिटलसह इतर सुविधा देणार असून, कोल्हापुरात आयटी पार्क उभारत असतानाच शेंडा पार्क येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा मानस आहे.शहराध्यक्ष आदिल फरास यांनी स्वागत केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार राजेश पाटील, शीतल फराकटे, के. पी. पाटील, रूपाली चाकणकर यांनी मनोगत व्यक्त केले. सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार मकरंद पाटील, विक्रम काळे, युवा नेते पार्थ पवार, माजी मंत्री आण्णा डांगे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे, मानसिंगराव गायकवाड, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी उपस्थित होते.
तर बरगड्या राहतील का?कोल्हापुरात येऊन कोणी पायताणाची भाषा करत असेल तर त्यांनी कोल्हापूरकरांना ओळखलेले नाही. पायताण कसे बनवायचे, ते पायात कधी घालायचे आणि पायातून काढून हातात घेऊन डोक्यात मारायचे कधी? हे येथील जनतेला माहिती आहे. जी अशी भाषा करतात, त्यांना मुश्रीफ यांनी प्रेमाने मिठ्ठी मारली तर बरगड्या तरी राहतील का? असा टोला मंत्री मुंडे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला.
नोव्हेंबरमध्ये अमित शहांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटनकेंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नोव्हेंबरमध्ये मुलींचे वसतिगृह, लायब्ररी, सहाशे बेडचे हॉस्पिटल यासह जिल्हा बँकेच्या विस्तारित इमारतीचे उदघाटन घेण्याचे नियोजन आहे. यावेळी तपाेवनच्या मैदानावर राष्ट्रीय सहकार परिषद घेणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.भुजबळ म्हणाले, मी पवारांचा ऋणीशरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बारे बलुतेदारांसह लहान घटकांना आरक्षण दिले. सगळ्यांना आरक्षण देण्याचे काम पवार यांनी केल्याने आम्ही त्यांचे ऋणी असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
कोल्हापूर आणि बीडचे नाते...बीड आणि काेल्हापूरचे नाते वेगळे असून, हसन मुश्रीफ हे बीडचे व्याही आहेत. दुसरे म्हणजे कोल्हापूर ऊस पिकवणारा तर बीड ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा जिल्हा असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.