कऱ्हाड : उंडाळे येथून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या विजयसिंह पाटीलचा निर्घृण खून करण्यात आल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. विजयसिंहचा मृतदेह पनवेल येथे समुद्र किनाऱ्यावर एका खाडीत आढळला असून, मारेकऱ्यांनी त्याचे हातपाय तोडले आहेत. तसेच मानेवरही वार करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत विजयसिंहचा कोणाशी वाद झाला होता का? याची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. गुरुवारी काहीजणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यातही आणण्यात आले होते. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. तपासासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली असून, वेगवेगळ्या शक्यता गृहित धरून तपास केला जात आहे. उंडाळेतील विजयसिंह सुखदेव पाटील (वय २८) हा युवक गेल्या चार दिवसांपासून संशयास्पदरीत्या बेपत्ता होता. ‘विटा येथून मजूर घेऊन यायचे आहेत,’ असे सांगून शनिवारी सायंकाळी तो घराबाहेर पडला. कऱ्हाडात आल्यानंतर भाऊ वैभव याच्याशी त्याचे मोबाईलवर बोलणे झाले. त्यावेळी गाडीत प्रवासी असल्याचे सांगत कऱ्हाडातून विट्याकडे निघाल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, त्यानंतर कुटुंबीयांचा त्याच्याशी संपर्क झाला नाही. कुटुंबीयांनी विजयसिंहच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. रविवारी दिवसभर तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी याबाबत उंडाळे पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विजयसिंहचा शोध सुरू केला. अशातच सोमवारी कवठेमहांकाळ येथे नागज घाटामध्ये तेथील स्थानिक पोलिसांना चारचाकी गाडी बेवारस स्थितीत आढळून आली. गाडीमध्ये रक्ताचे डाग होते. तसेच तेथून काही अंतरावर रक्ताने माखलेला मोबाईल व वाहनाचा लोखंडी कमानपाटा आढळून आला. (पान १ वरून) विजयसिंहचे नातेवाईक त्याठिकाणी पोहोचल्यानंतर संबंधित गाडी, मोबाइल व बूट विजयसिंहचे असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी मानवी शरीराचा काही मांसल भागही आढळून आला. त्यामुळे विजयसिंहचा घातपात झाल्याची शक्यता बळावली. पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत तपासाला सुरुवात केली. गुरुवारी काहीजणांना चौकशीसाठी तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांच्याकडून पोलिसांना काही माहिती मिळाली. कऱ्हाड पोलीस विजयसिंहचा शोध घेत असताना गुरुवारी दुपारी पनवेलला समुद्र किनारी खाडीत एका युवकाचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. खिशात आढळलेले ड्रायव्हिंग लायसन्स व डायरीवरून तो मृतदेह विजयसिंहचा असल्याचे निष्पन्न झाले. पनवेल पोलिसांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे पथकासह पनवेलला रवाना झाले. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह पनवेल येथीलच एका रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी कार्यवाही सुरू होती. थंड डोक्याचा नियोजनबद्ध कटज्यापद्धतीने विजयसिंहचा खून करण्यात आला त्यावरून थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध कट करूनच हा गुन्हा करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या गुन्'ात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असण्याची व विजयसिंहवर सलग काही दिवस पाळत ठेवण्यात आल्याची शक्यताही पोलीस व्यक्त करीत आहेत. विजयसिंह शनिवारी ‘विट्याला जातो,’ असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर कऱ्हाडात पोहोचल्यावर त्याचे भावाशी मोबाईलवरही बोलणे झाले होते. मात्र, सोमवारी त्याची गाडी व इतर साहित्य नागज घाटात आढळले. तर मृतदेह गुरुवारी पनवेलच्या खाडीत सापडला. यावरून मारेकऱ्यांनी नागज घाटात विजयसिंहचा खून करून नंतर दुसऱ्या वाहनाने मृतदेह पनवेलला नेल्याची शक्यता आहे.मारेकरीच प्रवासी बनून आले का ?कऱ्हाडात आल्यानंतर भाऊ वैभव याच्याशी विजयसिंहचे बोलणे झाले. त्यावेळी गाडीत प्रवासी असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, घरातून बाहेर पडताना ‘विट्याहून मजूर आणायचे आहेत,’ असे विजयसिंह म्हणाला होता. त्यामुळे कऱ्हाडमध्ये गाडीत प्रवासी म्हणून बसलेलेच विजयसिंहचे मारेकरी आहेत का ? असाही प्रश्न पोलिसांसमोर आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. विजयसिंहचा मृतदेह ज्या स्थितीत आढळला त्यावरून त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट होते. ज्याने कोणी त्याचा खून केला त्याने नियोजनबद्ध कट करूनच हा गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. खुनापाठीमागील कारण व हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे. लवकरच ते स्पष्ट होईल.- अण्णासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक
उंडाळेच्या विजयसिंह पाटीलचा खूनच !
By admin | Published: December 04, 2015 12:12 AM