कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावर विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी देखील या वर्षीचे बजेट म्हणजे येऊ घातलेल्या पाच राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर झालेला 'जुमलासंकल्प' असल्याची टीका केली आहे.सतेज पाटील यांनी म्हटले आहे की, कधीच अंमलबजावणी न होणाऱ्या पोकळ घोषणा देण्याची गेल्या ७ वर्षांतील परंपरा यावर्षीही सुरू राहिली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या भारतातील मध्यमवर्गीय व पगारदार वर्गाचा भ्रमनिरास टॅक्स ब्राकेट न वाढवून या बजेट ने केला असल्याचे ते म्हणाले.४५ वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी भाजप सरकारच्या काळात निर्माण झाल्याचे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. यावर कोणताही ठोस उपाय न योजता ६० लाख रोजगार देण्याचे पोकळ आश्वासन फक्त या बजेटमध्ये देण्यात आलेले आहे. आभासी चलनावर लादलेला कर हा गेल्या दोन वर्षातील या चलनात गुंतवणूक केलेल्या रिटेल गुंतवणूकदारांना मारक ठरणार आहे. एकीकडे कर लावला आहे मात्र आभासी चलनाच्या नियमांबाबत मात्र काहीच स्पष्टता नसल्याचे मत व्यक्त केले.सामान्य नागरिकाला या बजेटमधून नक्की काय मिळाले हे शोधूनही सापडत नाही आहे. देशातील सर्वसामान्य माणसांचा आवाज ऐकायचाच नाही अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा घेतलेली दिसतीये हेच या बजेटवरुन दिसून आल्याचे ते म्हणाले.
Union Budget 2022 : निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर झालेला 'जुमलासंकल्प' - मंत्री सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 5:15 PM