कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीसाठी अजूनही वर्षभर असताना भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये १९ फेब्रुवारीला दहा हजार कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी ही माहिती दिली.शहा हे एक दिवसाच्या दौऱ्यावर कोल्हापूरमध्ये येणार असून आल्यानंतर ते प्रथम शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांना अभिवादन करणार आहेत. यानंतर न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी समारोप कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. शहा यांच्या पत्नी सोनल या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. यानंतर नागाळा पार्कमधील भाजपच्या नूतन कार्यालय परिसरातील गणेश मंदिराचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते होणार असून याच परिसरात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.यानंतर शहा हे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघातील बूथ आणि शक्तीप्रमुखांची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी न्यू एज्युकेशन सोसायटी येथे विनोद लोहिया यांची भेट घेऊन कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती घेतली. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.भाजप नूतन कार्यालय परिसर पाहणीवेळी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, नाथाजी पाटील दिलीप मेत्राणी, गणेश देसाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि तालुकाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.उच्च परंपरा सांगान्यू एज्युकेशन सोसायटीने क्रीडा, सांस्कृतिक, संगीत नाटक अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. ती प्रामुख्याने या कार्यक्रमावेळी प्रभावीपणे मांडा, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी विनोदकुमार लोहिया यांना केली. यावेळी निर्मलकुमार लोहिया, नितीन वाडीकर, प्रभाकर हेरवाडे उपस्थित होते.
लोकसभेसाठी भाजपने ठोकला शड्डू, अमित शहांच्या उपस्थितीत कोल्हापुरात दहा हजार कार्यकर्त्यांचा मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 11:58 AM