Kolhapur News: सुमंगल लोकोत्सवास मंत्री शेखावत, कोल्हे, सोनाली बेंद्रेंसह दिग्गजांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:15 PM2023-02-16T12:15:26+5:302023-02-16T12:16:43+5:30
या लोकोत्सवात हजारावर साधुसंत, पाचशे कुलगुरू, दहा हजारांवर उद्योजक, चार हजारावर वैदू यांच्यासह जगभरातून परदेशी पाहुणेही दाखल होणार
कोल्हापूर : सिद्धगिरी कणेरी मठावर २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवासाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अनुराग ठाकूर, खासदार तेजस्वी सूर्या, खासदार अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज आणि कर्तबगार व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात पर्यावरण जागृती, व्यापार उद्योगाची वृद्धी, सेंद्रिय शेतीचा प्रसार यासह नव्या पिढीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी रोज दोन सत्रात अनेक मान्यवरांचा मुक्त संवाद होणार आहे. या लोकोत्सवात हजारावर साधुसंत, पाचशे कुलगुरू, दहा हजारांवर उद्योजक, चार हजारावर वैदू यांच्यासह जगभरातून परदेशी पाहुणेही दाखल होणार आहेत.
पाणीतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, बाबा सिचेवाल, संजयसिंह सज्जन, ५८ गावांतील दुष्काळ हटविणारे लक्ष्मण सिंह, पर्यटनवाढीत महत्त्वाची भूमिका बजावणारे कानसिंह निर्वाण, शंभर एकरमध्ये सेंद्रिय शेती करणारे किसनसिंह जाखड, देशातील सुप्रसिद्ध उद्योजक श्रीधर व्यंभू, हणमंतराव गायकवाड, पोपटराव पवार, विजय संकेश्वर, मिलेटमॅन डॉ. कादर, स्वामी त्याग वल्लभ दासी, माधवप्रिय दासजी, संशोधक गुरुराज करजगी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांचे अनुभव येथे ऐकायला मिळणार असल्याचे मठाचे विश्वस्त उदय सामंत आणि संतोष पाटील यांनी सांगितले.