कोल्हापूर: विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील चिंचवडमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बोचरी टीका केली होती. पवारांच्या या टीकेला मंत्री राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे यांनी थेट दमच देत अजित पवाराचे पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका, अशा शब्दात इशारा दिला. कोल्हापूर दौऱ्यावर आले असता आज, शनिवारी त्यांनी अजित पवारांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहीत नाही. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो असेही ते म्हणाले. तर, जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला, ठाकरेंकडे राहिलं काय? कुठलंही अस्तित्व नाही. पक्षातून गेलेले लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, अडीच वर्षात आपण काय केलं ते पहा म्हणावं असेही त्यांनी यावेळी सांगितले.राणेंवर टीका करताना काय म्हणाले होते अजित पवार...चिंचवडमध्ये बोलताना अजित पवार यांनी मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेला सोडून गेलेले कसे पराभूत झाले हे सांगताना त्यांनी राणेंना तर वांद्रेत बाईनं पाडलं असं म्हणाले होते. वांद्रे पोटनिवडणुकीत 2015 मध्ये काँग्रेस उमेदवार नारायण राणेंचा शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी पराभव केला होता. त्यामुळे अजित पवार बाईनं पाडलं म्हणत राणेंना डिवचले होते.
सपत्नीक घेतले अंबाबाईचे दर्शन दरम्यान, पत्नी निलम सह करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देवस्थान समितीच्यावतीने राणे दांपत्याचा अंबाबाई यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.