कोल्हापुरात गडकरी, राऊत, कोल्हेंसह बच्चू कडूंची तोफ धडाडणार, मुख्यमंत्री शिंदे यांची रविवारी रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 12:31 PM2024-05-03T12:31:06+5:302024-05-03T12:31:38+5:30
महायुती, महाविकास आघाडीकडून जोडण्यांना वेग
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपण्यास अवघे तीन दिवस राहिले असून, प्रचार यंत्रणेने वेग घेतला आहे. सभांचा धडाका सुरू असून, उर्वरित काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार संजय राऊत, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह ‘प्रहार’चे नेते बच्चू कडू यांच्या ताेफा ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघांत धडाडणार आहेत. शिंदेसेनेच्या वतीने रविवारी (दि. ५) काढण्यात येणाऱ्या दुचाकी रॅलीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
‘काेल्हापूर’ मतदारसंघात महायुतीचे संजय मंडलिक व महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती यांच्यात सरळ लढत होत आहे. तर ‘हातकणंगले’ मतदारसंघात महायुतीचे धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरूडकर, ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी व ‘वंचित’चे डी. सी. पाटील यांच्यात सामना होत आहे. गेले पंधरा-वीस दिवस प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे, रोहित पवार, बाळासाहेब थोरात आदींच्या सभा झाल्या आहेत.
जाहीर प्रचाराची सांगता रविवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजता होत आहे. त्यामुळे तीन दिवसांत प्रचाराचा अक्षरश: धुरळा उडणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शनिवारी संजय मंडलिक यांच्यासाठी महासैनिक दरबार येथे व्यापारी, उद्योजक यांच्यासमवेत सभा आहे. शुक्रवारी खासदार अमोल कोल्हे हे शाहू छत्रपती यांच्यासाठी कोल्हापुरात असून, ते कागल व कसबा बावड्यात सभा घेणार आहेत. त्याचबरोबर ‘प्रहार’चे नेते बच्चू कडू हे राजू शेट्टी यांच्यासाठी शिराळ्यात सभा घेणार आहे. त्याशिवाय खासदार संजय राऊत, आदेश बांदेकर, जॅकी श्राॅफ आदींच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत.
रविवारी पदयात्रांवरच भर
‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’साठी मंगळवारी (दि. ७) मतदान होत आहे. त्यासाठी जाहीर प्रचाराची सांगता रविवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजता होत आहे. या दिवशी कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर या प्रमुख शहरांसह मतदारसंघातील मोठ्या गावांतून पदयात्रा, दुचाकी रॅली काढण्याचे नियोजन महाविकास आघाडी व महायुतीचे आहे.