कोल्हापूर : बहुचर्चित बास्केट ब्रिजचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २८ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय महामार्गावरून पुणे, सांगलीकडून येताना शहरात थेट प्रवेशासाठी बास्केट ब्रिजची संकल्पना मांडण्यात आली होती. १८० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.महाडिक यांनी ही संकल्पना मांडून त्याला मंजुरी घेतली होती; परंतु राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय झाल्याने या ब्रिजच्या उभारणीला विलंब झाला. यावरून महाडिक यांच्यावर टीकाही करण्यात आली. त्यामुळेच या ब्रिजचे भूमिपूजन गडकरी यांच्याच हस्ते करण्याचा निश्चय महाडिक यांनी केला होता. त्यानुसार हा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.गडकरी हे शुक्रवारी २७ जानेवारीला सायंकाळी साडेसात वाजता कोल्हापूर येथे येणार आहेत. रात्री आठ वाजता खासदार महाडिक यांच्या निवासस्थानी त्यांची भेट असून त्यांचा कोल्हापुरात मुक्काम आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता गडकरी हुबळीला जाणार असून, दुपारी एक वाजता ते परत येणार आहेत. यानंतर चकोते उद्योगसमूहाला त्यांची भेट असून परत कोल्हापूरमध्ये येताना चार वाजता त्यांच्या हस्ते बास्केट ब्रिजचे भूमिपूजन होईल. यानंतर ते महाडिक यांच्या कृषी महोत्सवाला भेट देणार असून साडेसहा वाजता नागपूरला रवाना होणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते कोल्हापुरातील बास्केट ब्रिजचे भूमिपूजन होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 12:21 PM