कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात शहर व जिल्हा नागरी कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. ९९ रुपयांवर पेट्रोल गेल्याने वाहनचालकाला ते खरेदी करणे शक्य होत नसल्याने मोटरसायकलनेच फास लावून घेतल्याचे प्रतिकात्मक आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरवाढ तात्काळ मागे घ्या, अशा मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अनंत गुरव यांना दिले.यामध्ये म्हटले आहे की, स्वयंपाकाचा गॅस आणि पेट्रोल, डिझेल हे इंधन मानवी जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. या वस्तू असल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. असे असताना पेट्रोलचा प्रतिलिटर दर ९९ व डिझेलचा दर ९० रुपयांच्या पुढे, तर स्वयंपाकाचा गॅस ८०० रुपयांच्या आसपास असून हे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत.
गेले वर्षभर लॉकडाऊनमुळे जनता आर्थिक अडचणीत आहे. दरवाढ जगणं असाहाय्य करणारी आहे. त्यांच्यामध्ये असंतोष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवाढ कमी करण्यासंबंधी काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीत, ही निंदनीय बाब आहे. त्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे किंवा गगनाला भिडलेली दरवाढ त्वरित सामान्य जनतेला परवडेल अशा पध्दतीने करावी.यावेळी रमेश मोरे, अशोक पोवार, संभाजीराव जगदाळे, रणजित पवार, विनोद डुणूंग, चंद्रकांत पाटील, श्रीकांत भोसले, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.