मुरगूड : ठिकाण यमगे (ता. करवीर) गावभागातील प्राथमिक शाळेचा परिसर. तरुणांनी शाळेजवळ असणारा भला मोठा कचऱ्याचा ढीग हलविला व परत त्याठिकाणी कचरा येऊ नये यासाठी त्यांनी नामी शक्कल लढविली. त्यातूनच कुणी शेंदूर आणला, कुणी हार आणला, कुणी अगरबत्ती, तर कुणी चक्क ठावकचं आणलं. कचऱ्याचा ढीग होता त्याठिकाणी एका भल्या मोठ्या दगडाला शेंदूर फासला, त्याला हार घालून चक्क म्हसोबाची स्थापनाच केली. याचा अपेक्षित परिणामदेखील झाला. चार दिवसांपासून त्या ठिकाणी मात्र कोणीही कचरा टाकायला धजावलं नाही. त्यामुळे ‘चिडका म्हसोबा आला अन् कचरा नाहीसा झाला’. तरुणाच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने स्वच्छता अभियानाला बळकटी मिळाली आहे.भारतभर स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; पण याला अपवाद काही गावे होतीच. यमगे (ता. कागल) या गावामध्ये मात्र कित्येकवेळा प्रबोधन होऊनसुद्धा सार्वजनिक ठिकाणचा कचरा हलत नव्हता. गावभागामध्ये मराठी शाळेजवळ आणि पिण्याच्या पाण्याच्या हातपंपाच्या अगदी मधोमध कचऱ्याचा ढीग जमा होत होता. ठरावीक दिवसांनी ग्रामपंचायत हा ढीग हटवत होती. कचरा टाकू नये, असे लिहूनदेखील रोजरोसपणे लोक कचरा टाकतच होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.हा कचरा दूर जावा यासाठी ग्रामपंचायत, आजूबाजूचे नागरिक, शाळा प्रशासन यांनी अनेक उपाययोजना केल्या. सार्वजनिक तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी झाडे लावली, पंचायतीने जवळच पाण्याचा हौद बांधला, ग्रामपंचायत कर्मचारी काही काळ त्याठिकाणी पहारा देत थांबले; पण कचऱ्याचा ढीग काही केल्या निघेना. म्हणून शेवटी परिसरातील अशोक मोदी, अजित पाटील, अजित कादंळकर, शिवाजी कळमकर, अनिकेत पाटील, दीपक तेली, वासुदेव डोणे, बिरदेव डोणे, अजिंक्य पाटील, अमित हुल्ले, प्रशांत देसाई, पी. एन. देसाई, आदी १० ते १५ युवकांनी ही नामी शक्कल लढविली.कचऱ्याचा ढीग होता, त्याठिकाणी म्हसोबाची प्रतिष्ठापना झाल्याने कचऱ्याचा ढीग आपोआपच नाहीसा झाला. देवदेवतांच्या श्रद्धेचा पगडा ग्रामीण भागात असल्याने वेळप्रसंगी स्वच्छतेसाठी त्याचा असा वापर करणे गैर नाही, असा सूर अनेकांनी व्यक्त केला. (वार्ताहर)
यमगेतील तरुणांचा आगळा-वेगळा उपक्रम
By admin | Published: December 29, 2014 10:51 PM