कोल्हापूर : कोरोना विरुध्दच्या लढाईत कोणी कर्तव्य म्हणून, तर कोणी स्वयंसेवक बनून लढत आहेत. सामान्य नागरिक सुध्दा घरात बसून लढाई लढत आहे. प्रत्येकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशा लढवय्या योद्ध्याचे सत्कार होत आहेत. कोल्हापुरात मंगळवारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील ३२ कर्मचाºयांवर उतरविण्यात आलेल्या विम्याची प्रमाणपत्रे देऊन असाच एक अनोखा सत्कार झाला. या विम्यामुळे जर कोणा कर्मचा-स कोरोनाची लागण झालीच, तर त्याला तत्काळ २५ हजार रुपयांची मदत होणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रत्यक्ष जमिनीवर सामना करणा-या स्वच्छतादूतांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना केले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी स्वच्छतेसाठी काम करणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी, रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य कर्मचारी यांचे सत्कार होत आहेत. असाच आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा सत्कार कोल्हापुरात पार पडला. कोरोना विरोधातील लढाईचे स्वच्छतादूत असलेल्या स्वच्छता कर्मचाºयांचा आरोग्य विमा उतरून भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी हा अनोखा सत्कार केला.
आरोग्य कर्मचारी सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे नकळत त्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन ठाणेकर यांनी प्रभागातील सर्व आरोग्य कर्मचारी, मुकादम आणि आरोग्य निरीक्षक अशा एकूण ३२ जणांचा विमा उतरविला. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, करनिर्धारक संजय भोसले, ज्येष्ठ श्रीपूजक बाबूराव ठाणेकर आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे अभिजित रेणाविकर यांचे हस्ते कर्मचा-यांना विम्याची प्रमाणपत्रे देण्यात आली. पूर्ण काळजी घेऊनही एखाद्या कर्मचा-यास कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तर त्याला तातडीने रुपये २५ हजार इतकी रक्कम या विम्याद्वारे उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमास आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, मुकादम सिकंदर बनगे, लता पोवार, माया पवार, सुजाता वायचळ, पौर्णिमा कांबळे, वनिता चोपडे आणि युवराज कांबळे यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे देण्यात आली. रोहन स्वामी, शुभम तोडकर, उर्मिला ठाणेकर यांनी सहकार्य केले.