कोल्हापूर : वेस्टर्न माउंटन स्पोर्टस व हिल रायडर्स अॅँड हायकर्स गु्रपचे सदस्य जयदीप गुणाजीराव जाधव व पाडळी खुर्दची रेश्मा पाटील हे दोघे साहसी पद्धतीने शाहूवाडीतील भाततळी परिसरातील जखनाईचा कडा येथे उद्या, रविवारी दुपारी १२ वाजता विवाहबद्ध होत आहेत. ते गिर्यारोहणातील व्हॅली क्रॉसिंग तंत्र वापरून हवेत तरंगत लग्न करणार आहेत. गेल्या १७ वर्षांपासून वेस्टर्न माउंटन व हिल रायडर्स गु्रपच्या माध्यमातून जयदीप जाधवने गिर्यारोहणाची व भटकंतीची आवड सांभाळली. त्यामुळे जयदीपने आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षण म्हणजेच विवाह हासुद्धा गिर्यारोहणाच्या तंत्राने व्हावा, असे मनोगत गु्रपचे विनोद कांबोज, प्रमोद पाटील व मुंबईतील मलय अॅडव्हेंचर्सचे मेहबूब मुजावर या ज्येष्ठांपुढे व्यक्त केले. यासाठी जागेची पाहणी करून विशाळगडचा पवित्र परिसर निवडला. हे निवडण्यामागे १७ वर्षांपूर्वी पन्हाळा-पावनखिंड या मोहिमेने जयदीपने गिर्यारोहणाची सुरुवात केली होती.प्रथम जयदीपने ही साहसी विवाहाची गोष्ट घरच्यापुढे बोलून दाखविली. त्याला घरच्यांनी विरोध केला; पण त्याच्या गिर्यारोहणाच्या वेडापायी त्यांनीही होकार दर्शविला. गिर्यारोहणाची आवड असणारी रेश्मा पाटील हिलाही त्यांनी ही साहसी लग्नाची कल्पना सांगितली. त्यावर तीही तयार झाली. त्या दृष्टीने तिच्या नातेवाइकांनीही या अनोख्या विवाहास मान्यता दिली. हा विवाह आता उद्या दुपारी १२ च्या मुहूर्तावर होत आहे. तो शाहूवाडीतील भाततळी परिसरात जखनाईचा कडा आहे. त्यावर गिर्यारोहणातील व्हॅली क्रॉसिंगचे तंत्र वापरून करण्यात येणार आहे. यासाठी सर्व साधनसामग्रीची जय्यत तयारी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात असा विवाह प्रथमच होत आहे. त्यामुळे या विवाहाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
व्हॅली क्रॉसिंगद्वारे हवेत तरंगत अनोखा विवाह
By admin | Published: July 30, 2016 12:03 AM