कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४८ तटाकडील तालीम येथील इच्छुक उमेदवारांचा मिलनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
ब्रह्मेश्वर मंदिर येथे झालेल्या या उपक्रमास चार इच्छुक महिला उमेदवारांनी हजेरी लावली आणि निवडणूक मैत्रीपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचा हा संकल्प करण्यात आला,
महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारती सतीश पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. भारती सतीश पाटील, मयूरी महेश उरसाल, ऋतुजा तेजस जाधव, शुभदा योगेश्वर जोशी, नम्रता मंगेश पाटील या हजर होत्या. इच्छुक उमेदवारांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीचे पूजन करून ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते श्रीफळ वाढवून उपक्रमास प्रारंभ केला.
सतीश पाटील यांनी स्वागत केले. हिंदुत्ववादी संघटनेचे महेश उरसाल यांनी या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेनेचे रणजित जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व महिला उमेदवारांनी आपला परिचय करून दिला आणि मतदान करण्याचे आवाहन केले. तटाकडील तालमीचे भाऊ गायकवाड, सुजय साळोखे ,निवृत्ती तरुण मंडळाचे पांडुरंग शेळके, गुरुजी रामचंद्र इंगवले, सायब पोवार, किरण पोवार, अचानक तरुण मंडळाचे परेश वेढे, हिंदवी स्पोर्ट्सचे अमित जाधव, युवासेनेचे विश्वदीप साळोखे,आदींसह भागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.