कोल्हापूर : संतांचे विचार आणि शिकवणुकीमुळेच आज देशात एकता आणि बंधुता टिकून आहे, पुढेही याच विचारावर वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि इंडसमून मीडिया प्रा.लि., मुंबई प्रायोजित पहिले विश्वात्मक संतसाहित्य सांस्कृतिक संमेलन मंगळवारी कोल्हापुरात झाले. संमेलन अध्यक्ष ह.भ.प. मदन महाराज गोसावी आणि संमेलन स्वागताध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, पंढरपूरला निघणारी वारी ही जगासाठी कुतूहलाचा विषय आहे. संपूर्ण जग हे आपले कुटुंब आहे, असाच विचार संतांनी सांगितला. मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्य वेचले. वेगवेगळ्या भाषेत, प्रातांत संत जन्माला आले तरी त्यांचा भाव हा कायम एकतेचा आणि समाज जोडणाराच राहिला. या सर्वांनी समाजाला एकतेच्या तत्त्वात गुंफले. आज जग संतसाहित्याचा अभ्यास करीत आहे, आपणही तो अधिक आत्मीयतेने करायला हवा.
स्वागत अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले, संतसाहित्यामध्ये घेण्यासारखे खूप आहे. राज्याला साहित्य संमेलनाची मोठी परंपरा आहे. संतांनी आपल्या साहित्यातून भूतदया हा मंत्र जगासमोर आणला. संमेलनाच्या माध्यमातून हा मंत्र जोपासण्याचा विचारही रुजेल.
दरम्यान, सकाळी टाळ-मृदंग व हरिनामाच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन मदन महाराज गोसावी व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदालनाचे उद्घाटन संत साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते, तर आध्यात्मिक विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या चित्रदालनाचे उद्घाटन डॉ. सुहास बहुलकर यांच्या हस्ते झाले.
जातिभेदविरहित समाज निर्माण करणे हाच उद्देश : मदन महाराज गोसावी
संमेलन अध्यक्ष मदन महाराज गोसावी म्हणाले, आज वर्तमान अस्वस्थ असल्याच्या काळात संतविचार मार्गदर्शक आहेत. कोरोनासारख्या विषाणूने अख्ख्या जगाला त्रास दिला; पण याच वेळी विश्वबंधुत्वाची जाणीवही करून दिली. या मातीत अनेक संत, पंथ उदयास आले. या सर्वांचे मानवतावादी तत्त्वज्ञान पुन्हा एकदा जगासमोर आणण्याची गरज आहे. समानतेच्या वाटेवर चालणारा, जातिभेदरहित समाज निर्माण करणे, हाच हे संमेलन भरवण्यामागचा उद्देश आहे.
महंत ऋषिश्वरानंद यांना जीवनगौरव पुरस्कार
हरिद्वारचे महंत ऋषिश्वरानंद यांचा कणेरी मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते विश्वात्मक संत जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.