गडहिंग्लज :
गडहिंग्लज पाठोपाठ चंदगड तालुक्यातील कुपेकर गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकीची मूठ बांधली. 'गोकूळ'सह आगामी सर्व निवडणुका एकजुटीने व ताकदीने लढण्याचा निर्धार प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत केला आहे.
चंदगड येथील सोयरिक मंगल कार्यालयात ही बैठक झाली. माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी अचानक विधानसभेच्या निवडणुकीत माघार घेतल्यानंतर आलेली मरगळ झटकून त्यांचे समर्थक पुन्हा एकत्र आल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
माजी जि.प. सदस्य बाबूराव हळदणकर म्हणाले, कुपेकर गट म्हणजे एक कुटुंब आहे. कुटुंबातील एकी कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.
गणेश फाटक म्हणाले, नंदाताई लवकरच पुन्हा राजकारणात सक्रिय होतील. गोकूळ, केडीसीसी, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील.
यावेळी विलास पाटील, विष्णू गावडे, निंगू भादवणकर, प्रताप डसके, दत्तू विंझणेकर, बबन देसाई व बंडोपंत रावराणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
बैठकीस भैरू खांडेकर, रघुनाथ नाकाडी, नागोजी नाईक, दीपक चांदेकर, मधुकर मोटार, नारायण गावडे, रवळनाथ गावडे, सुनील देसाई, संजय राऊत, अजित गावडे, दौलत दळवी, अजमल नाईक, शाहरूख व्यापारी, अरीफ खेडेकर, ईस्माईल शहा, झाकीर नाईक, अब्दुल मुल्ला, शिवराज देसाई, आप्पाजी गावडे, आनंदराव भोसले, सागर पाटील, विनोद पाटील, बसवंत अडकूरकर, विलास चव्हाण, सचिन दळवी, संतोष गावडे आदी उपस्थित होते.
--
-
* निष्ठावंतांना सापत्नाची वागणूक
स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी चंदगडमध्ये राष्ट्रवादीचा पाया घातला. त्यांच्या पश्चात संध्यादेवी व नंदाताईंनी पक्षाची मजबूत बांधणी केली, त्यांच्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळाला. परंतु, अलीकडच्या काळात कुपेकर गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. यासंदर्भात लवकरच शिष्टमंडळाने वरिष्ठांची भेट घेणार आहोत, असे तजमुल फणीबंद यांनी सांगितले.
-
फोटो ओळी : चंदगड येथे झालेल्या कुपेकर गटाच्या बैठकीत बाबूराव हळदणकर यांनी मार्गदर्शन केले. समोर उपस्थित कार्यकर्ते.
क्रमांक : १८०३२०२१-गड-०९