(सतेज पाटील यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या लढाईत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने देदीप्यमान विजय मिळविला. त्यामागे अनेक राजकीय कंगोरे असले, तरी नेत्यांमधील एकवाक्यता, सूक्ष्म नियोजन व त्यानुसार झपाटल्यासारखी पळालेली यंत्रणा हेच खरे कारण आहे. सर्वच नेत्यांची यंत्रणा ताकदीने प्रचारात काम करत असली तरी विशेषकरून पालकमंत्री सतेज पाटील यांची सहाशे जणांची टीम एकसंधपणे राबली. गेल्या दीड वर्षापासून ठरावधारकांची ओळख करून घेतल्यापासून ते मतदान केंद्रावर येईपर्यंत या टीमने काम केल्याचे फलित म्हणजे हा विजय आहे.
कोणत्याही लढाईची तयारी ही अगोदरच करावी लागते. केवळ तयारी करून उपयोग नाही, तर विरोधकांचे डावपेच, त्यावर प्रतिडाव करण्यासाठी राबणारी यंत्रणा उभी करून त्याची अंमलबजावणीही तितकीच नियोजनबद्ध झाली तरच शंभर टक्के यश मिळते. ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुसऱ्या दिवसापासून पुढच्या निवडणुकीची तयारी केली. पाच वर्षे सत्तारूढ गटाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला सत्तारूढ गटाला मल्टीस्टेट, दूध दरवाढ व टँकर वाहतुकीसह इतर मुद्द्यांवर जखडून ठेवले होते. दुसऱ्या बाजूला सत्तारूढ गटातील नाराज मोहऱ्यांना आपल्या छावणीत आणण्याची व्यूहरचना आखली आणि त्यात यशस्वी झाले. डिसेंबर २०१९ ला ‘गोकुळ’साठी ठराव करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याअगोदर सहा महिने संबंधित दूध संस्था प्रतिनिधींच्या संपर्कात मंत्री सतेज पाटील यांची यंत्रणा होती. प्रत्येक तालुक्यात एक जबाबदार व्यक्ती व त्याला ताकद देणारी यंत्रणा उभी केली. गेली दोन वर्षे सहाशे जणांची टीम काम करीत होती.
याउलट, विरोधी आघाडीतील राबणाऱ्या व्यक्तींमध्ये ताळमेळ दिसत नव्हता. पॅनेलपेक्षा व्यक्तिगत मतासाठी बहुतांशी जणांनी ताकद लावल्याने सांघिक काम दिसले नाही. त्याचा फटका नवीन व कमी संपर्क असलेल्या उमेदवारांना बसला.
हे केले टीमने
ठरावधारक कोण, तो कोणाशी संबंधित ही यादी करायची
त्याला आपल्याकडे वळण्यासाठी कोणाचे वजन वापरावे
अशाप्रकाणे ठरावधारकांची कुंडली तयार केली.
पॅनेल बांधणीपूर्वी प्रत्येक तालुक्यातील नेत्यांशी, प्रत्येक ठरावधारकाच्या नावावर चर्चा.
तो कोणाकडे राहील, कोणाचे ऐकेल याची नेत्यांकडून खातरजमा
ठरावधारकाच्या पहिल्या भेटीपासून संपर्कात असणाऱ्या व्यक्तीवरच मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी