कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने ऑनलाईन परीक्षेतील पहिला निकाल बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास जाहीर केला. बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या आठव्या सत्रातील १३२८ विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील विविध २२ फार्मसी कॉलेजमधील एकूण १३२८ विद्यार्थ्यांनी अंतिम सत्राच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यांची ऑनलाईन पद्धतीने दि. २७ ऑक्टोबरला परीक्षा सुरू झाली. ती सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) संपली. त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून २४ तासांमध्ये निकाल जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी दिली.
दरम्यान, विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा दि. २७ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. एकूण १५५ परीक्षा होणार असून त्यासाठी ४८२५८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, तर २४४७५ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा देण्याचा पर्याय निवडला आहे.