कोल्हापूर : सामान्य नागरिकांसाठी शिवाजी विद्यापीठाचा परिसर आज, शुक्रवारपासून रोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत खुला राहणार आहे. अधिकार मंडळाच्या निर्णयास अधिन राहून विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय गुरुवारी घेतला आहे.
विद्यापीठाचा परिसर सामान्य नागरिकांना एक जानेवारीपासून मॉर्निंग वॉकसाठी खुला करा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने मंगळवारी दिला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. १५ मार्च रोजीच्या परिपत्रकानुसार विद्यापीठ परिसरात सकाळी आणि सायंकाळी नागरिकांनी फिरावयास येणे टाळावे, असे कळविले होते. परंतु, सध्या विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन, जिल्हा प्रशासन यांचा आदेश, मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आणि विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निर्णयास अधिन राहून सद्यपरिस्थितीत विद्यापीठ परिसर सकाळी सहा ते नऊ या वेळेत सर्वसामान्यांना खुला केला जाणार आहे. फिरावयास येणाऱ्या नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.