संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विद्यापीठ सेवक आज, सोमवारपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र, आज झालेल्या बैठकीत आंदोलन स्थगित करण्यात आले. याबाबत अंतिम निर्णय बुधवारी होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघाचे सचिव मिलिंद भोसले यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पंधरा दिवसांपूर्वी बेमुदत आंदोलन केले होते. त्यानंतर कर्मचारी संघाच्या मागण्या शासनाने मान्य केल्याने हे आंदोलन तूर्तास स्थगित झाले. गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करीत आहेत. या संपामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कर्मचारी आज, सोमवारपासून सहभागी होणार होते. याबाबत रविवारी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघाची बैठक मुंबईत झाली.
या बैठकीत आज, सोमवारपासूनचे आंदोलन स्थगित करण्यात आले. जुनी पेन्शनसाठी बेमुदत आंदोलनात सहभागी होण्याबाबतचा निर्णय बुधवारी केला जाणार आहे. तूर्तास नेहमीप्रमाणे दुपारी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर येऊन कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी निदर्शने करणार आहेत, अशी माहिती सचिव मिलिंद भोसले यांनी दिली.