कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या गोदाम विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला चुकीचा मेमो दिल्याच्या कारणावरून विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. विद्यापीठ सेवक संघाच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या मारून प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
गोदाम विभागातील संबंधित चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने संघटनेच्या कामानिमित्त रजा घेतली होती. रजा असताना देखील या कर्मचाऱ्याला त्यादिवशीचा मेमो देण्यात आला आहे. ही बाब सेवक संघाला समजताच संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (२१) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची भेट घेऊन त्यांना संबंधित मेमो मागे घेण्यात यावा, अशी मागणी केली.
मेमो मागे घेतला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा संघाने यावेळी दिला. प्रशासनाने मेमो मागे घेण्याची कार्यवाही केली नसल्याने सेवक संघाचे पदाधिकारी, सभासदांनी मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजल्यापासून कामबंद आंदोलन सुरू केले.
प्रशासनाने मेमो मागे घेतल्याशिवाय काम सुरू करणार नसल्याचा निर्धार करीत त्यांनी मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या मारला. यावेळी ‘अन्यायकारक, चुकीचा मेमो मागे घ्या’, ‘हम सब एक है’, अशा घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात संघाचे अध्यक्ष बाबा सावंत, अतुल ऐतवडेकर, मिलिंद भोसले, राम तुपे, विशांत भोसले आदींसह सुमारे पाचशे कर्मचारी सहभागी झाले.
कामकाज ठप्पकर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने विद्यापीठातील प्रशासकीय आणि अधिविभागांमधील कामकाज ठप्प झाले. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला.