कऱ्हाड : प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्याचे कारण सांगून विद्यार्थ्यांचा निकाल अडवून ठेवणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला आज, शनिवारी ‘लोकमत’च्या दणक्यानंतर खडबडून जाग आली. ‘कॉलेज-विद्यापीठाच्या विसंवादात विद्यार्थ्यांचा निकाल’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच विद्यापीठाने दुपारी घाईगडबडीत सुमारे तेराशे विद्यार्थ्यांचा निकाल ‘आॅनलाईन’ जाहीर केला. निकाल जाहीर झाल्याचे कळताच अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी नेट कॅफेकडे धाव घेतली. काहींनी मोबाईलवर तर काहींनी लॅपटॉपवर विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट तपासली. निकाल पाहताच विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला. ‘लोकमत’ने वाचा फोडल्यामुळे विद्यापीठाने तातडीने निकाल जाहीर केल्याचे सांगत शेकडो विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले. कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रथम सत्राची परीक्षा डिसेंबरमध्ये झाली असून, विद्यापीठाने इतर महाविद्यालयांचा निकालही जाहीर केला. मात्र, या महाविद्यालयाचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठात विचारणा केली असता, तुमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्याने निकाल राखून ठेवल्याचे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. या प्रकारामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले होते. याबाबत आज, शनिवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनासह विद्यापीठाला खडबडून जाग आली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विद्यापीठाने सर्व शाखांचा निकाल ‘आॅनलाईन’ जाहीर केला. उशीर विद्यापीठाचा; गैरसमज पालकांचा‘इतर महाविद्यालयांतील सर्व शाखांचा निकाल काही दिवसांपूर्वीच आॅनलाईन जाहीर झाला. त्याबाबतची माहिती आमच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केला. आमचा निकाल जाहीर झाला नसल्याचे आम्ही त्यांना सांगितले. पण, दररोज आम्ही हेच कारण सांगत असल्याने पालकांचा विश्वास बसत नव्हता. ‘सगळ्या कॉलेजचा निकाल लागला, मग तुझा का नाही,’ असे म्हणत काही पालकांनी ‘तू नापास तर झाला नाहीस ना,’ असा संशयही व्यक्त केल्याचे काही विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विद्यापीठ खडबडून जागे; कऱ्हाडच्या ‘अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर
By admin | Published: February 01, 2015 12:57 AM