सांगली : शिवाजी विद्यापीठाच्या मंदगती आॅनलाईन संकेतस्थळामुळे पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टळले आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत विद्यापीठाने संकेतस्थळाला गती दिली आहे. तसेच प्रवेशापासून वंचित राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पात्रता अर्जासाठी मिळालेल्या मुदतवाढीने दिलासा मिळाला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या आॅनलाईन अर्जांच्या संकेतस्थळाने निर्माण केलेल्या गोंधळाने, पदवीच्या पहिल्याच घासाला विद्यार्थ्यांना खडा लागला होता. कोल्हापूर, सातारा, सांगली येथील महाविद्यालयांमध्ये कागदोपत्री प्रवेश पूर्ण झालेल्या कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक यांसह अन्य विषयांच्या पदवीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश, पात्रता अर्ज भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, संकेतस्थळच मंद असल्याने तिन्ही जिल्ह्यांत हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. अर्जांची मुदत ३0 जुलैपर्यंत होती. त्यामुळे इतक्या कमी कालावधित हजारो अर्ज आॅनलाईन दाखल होणे मुश्कील होते.महाविद्यालयांनीही विद्यापीठाला याची कल्पना दिली होती. ‘लोकमत’ने या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर त्याची दखल विद्यापीठाने घेतली. आता २0 आॅगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर संकेतस्थळाची गती वाढविण्याच्यादृष्टीने तांत्रिक सुधारणा केली आहे. त्यामुळे शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील अनेक नेट कॅफेमध्ये प्रलंबित असलेल्या अर्जांचे ढीग गतीने कमी होत असल्याचे चित्र दिसून आले. ही गती कायम राहावी, अशी अपेक्षा काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. विद्यापीठाने मुदतवाढ देऊन प्रथमवर्ष पदवीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला. आता संकेतस्थळ गतिमान ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे तांत्रिक गोष्टीमुळे नुकसान होऊ नये. - शुभम जाधव, माजी सदस्य, विद्यार्थी मंडळ, शिवाजी विद्यापीठ.विलंब शुल्क नाहीतांत्रिक अडचणींमुळे पात्रता अर्ज दाखल करण्याची मुदतवाढ दुसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे. २0 आॅगस्टपर्यंत अर्ज दाखल करताना विद्यार्थ्यांना कोणताही विलंब शुल्क लागू होणार नाही, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
विद्यापीठाच्या संकेतस्थळाने घेतली गती
By admin | Published: July 30, 2016 12:25 AM