कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे यांनी, शनिवारी (दि. १) राजीनामा दिला. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ‘नॅक’ मूल्यांकनाची विद्यापीठाकडून तयारी सुरू असताना अचानकपणे डॉ. मोरे यांनी राजीनामा दिल्याने विद्यापीठ क्षेत्रात वेगळी चर्चा सुरू आहे.जानेवारी २०१८ मध्ये डॉ. मोरे यांची शैक्षणिक सल्लागारपदी नियुक्ती झाली. त्यानंतर काही महिन्यांतच शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)सह अन्य काही संघटनांनी या शैक्षणिक सल्लागारपदाच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. कुलसचिव, प्र-कुलगुरू आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता असताना पुन्हा शैक्षणिक सल्लागार यांची काय गरज आहे, असा प्रश्न वारंवार या संघटनांकडून उपस्थित केला जात होता.
वर्षभरापूर्वी अधिसभेमध्येही या पदाच्या नियुक्तीचा वाद रंगला होता. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ‘सुटा’ने सुरू केलेल्या आंदोलनाने पुन्हा या पदाच्या नियुक्तीचा मुद्दा पुढे आला. सप्टेंबरमध्ये विद्यापीठ ‘नॅक’ मूल्यांकनाला सामोरे जाणार आहे. त्याची तयारी सुरू असताना डॉ. मोरे यांनी या पदाचा शनिवारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
दरम्यान, विविध संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून या पदाच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. आगामी ‘नॅक’ मूल्यांकनाच्या तोंडावर त्याबाबतचा वाद निर्माण होऊ नये म्हणून मोरे यांनी राजीनामा दिल्याची विद्यापीठ क्षेत्रात चर्चा सुरू आहे.
प्रभारी कुलगुरू, बीसीयूडी संचालक, शैक्षणिक सल्लागार या पदांसह व्यवस्थापन आणि विद्या परिषद, अधिसभा, तक्रार निवारण समितीवर काम केले आहे. विद्यापीठासाठी भरीव काम करण्याची संधी मिळाली. शैक्षणिक सल्लागारपदाचा राजीनामा देण्याचा विचार गेल्या काही दिवसांपासून मनात होता. अखेर शनिवारी राजीनामा दिला. वाचन, लेखनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून या पदाचा राजीनामा दिला आहे.-डॉ. डी. आर. मोरे