कोल्हापूर : इन्फ्लिबनेट माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने नेचर समूहाची संशोधनपत्रिका (जर्नल) संदर्भासाठी सर्वाधिक वापरली आहे. त्याबद्दल जागतिक पातळीवरील पालग्रेव्ह मॅकमिलन समूहाच्या नेचर पब्लिशिंग ग्रुपतर्फे विद्यापीठाला सन २०१५चा ‘एनपीजी ई-जर्नल्स युसेज अवॉर्ड’ हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला आहे. गेल्या महिन्यात नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फे्रमवर्कच्या क्रमवारीतील देशात २८वे आणि राज्यात पहिले स्थान मिळविले होते. आता ‘नेचर’च्या पुरस्काराद्वारे पुन्हा एका बहुमानाचे विद्यापीठ मानकरी ठरले आहे.विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (युजीसी) विद्यापीठांसाठी इन्फोनेट डिजिटल लायब्ररी कॉन्सॉर्शियम (इन्फ्लिबनेट) हा उपक्रम राबविला जातो. याअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातर्फे संशोधक विद्यार्थ्यांसाठी जगभरातील विविध विषयांच्या संशोधनपत्रिका आणि अधिकृत डाटाबेस उपलब्ध करून दिला जातो. सध्या विद्यापीठात सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून ५१ आणि इन्फ्लिबनेटच्या माध्यमातून ८५९२ अशी एकूण ८६४३ ई-जर्नल व १० डाटाबेस संशोधक विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. यातील नेचर संशोधनपत्रिकेच्या व्यक्तिगत वापरामध्ये सन २०१४ च्या तुलनेत सन २०१५मध्ये वाढ झाली. इन्फ्लिबनेटच्या आकडेवारीनुसार ई-जर्नल वापराचा हा आकडा ३४ वरून १८४४ इतका वाढला. त्यामुळे नेचर ग्रुपच्या द्वितीय पुरस्कारास शिवाजी विद्यापीठ पात्र ठरले. यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोचीन युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला जाहीर झाला असल्याची माहिती ‘नेचर’चे भारतातील सहाय्यक सरव्यवस्थापक राजेंद्र कुमार यांनी ई-मेलद्वारे दिली. विद्यापीठाला जाहीर झालेल्या संबंधित पुरस्कारामुळे विद्यापीठाचे विद्यार्थी संदर्भासाठी आॅनलाईन ई-जर्नल सुविधांचा चिकित्सकपणे वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)शिवाजी विद्यापीठातील संशोधक मूलभूत संशोधनामध्ये अत्यंत उत्तम कामगिरी बजावत आहेत. ते ‘स्कोपस’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ‘नेचर’ या जागतिक दर्जाच्या संशोधन पत्रिकेचा संदर्भ म्हणून विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी गांभीर्याने वापर करीत आहेत, ही समाधानाची बाब आहे. - कुलगुरू डॉ. देवानंद शिंदेनेचर संशोधन पत्रिकाच नव्हे, तर अन्य संशोधन पत्रिकांच्या एकूण वापरातही सन २०१५मध्ये वाढ झाली आहे. विद्यापीठातील इन्फ्लिबनेट संशोधक वापरकर्त्यांची संख्या सन २०१४ मध्ये २ लाख ८९ हजार ९२३ इतकी होती. सन २०१५मध्ये ३ लाख ४ हजार ५५२ झाली आहे. जागतिक पुस्तक दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार घोषित झाल्याचा विशेष आनंद आहे. -डॉ. नमिता खोत, ग्रंथपाल, शिवाजी विद्यापीठ
संशोधन पत्रिकांच्या वापरात विद्यापीठाची आघाडी
By admin | Published: April 23, 2016 1:35 AM