दिंडनेर्ली: रानडूक्कराच्या शिकारीसाठी अज्ञाताने शेतात गावठी बाँब ठेवला होता. या बाँबच्या स्फोटात एका कुत्र्याचा मृत्यू झाला. नंदगाव (ता. करवीर) येथील हरी राऊ साठे यांच्या पाटलाचा माळ परिसरातील शेतात ही घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर हरी साठे यांनी तत्काळ इस्पुर्ली पोलिसांत तक्रार दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नंदगाव दिंडनेर्ली रस्त्याच्या बाजुला पाटलाचा खडक परिसरातील नंदगाव येथील हरी राऊ साठे यांची ऊसशेती आहे. सोमवारी सकाळच्या दरम्यान चार ते पाच कुत्री फिरत होतीत. तेव्हा अचानक मोठा स्फोटाचा आवाज येऊन धुर येऊ लागला. बाजूच्या शेतात ऊसतोड सुरु असलेने ऊसतोड कामगारांनी या ठिकाणी धाव घेतली असता त्यांना कुत्रे तळमळत पडलेले दिसले. तर बाजुलाच गुंडाळी केलेले दोऱ्याचे तुकडे दिसले.रानडुकराच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब बनवून शेतामध्ये जागोजागी ठेवले जातात. डुक्कर तोंडात पकडून तोडायचा प्रयत्न करते तेव्हा त्याचा स्फोट होतो व शिकाऱ्याचा प्रयोग यशस्वी होतो. पण डुक्करा ऐवजी या कुत्र्यानेच हा बॉम्ब तोंडात पकडल्याने हकनाक बळी गेला...अन्यथा अनर्थ घडला असताआजच या शेतात भांगलणीसाठी महिला आल्या होत्या. तत्पूर्वीच हा प्रकार घडला अन्यथा महिला काम करीत असताना चुकून यावरती पाय पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता. तसेच ऊसतोड चालू असल्याने ऊसतोड कामगारांची मुले या ठिकाणीच खेळत असतात.अशा प्रकारे जेव्हा शिकार केली जाते तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी चार ते पाच बॉम्ब ठेवले जातात. त्यामुळे अजून त्या शेतामध्ये बॉम्ब असण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये आहे.
रानडूक्कराच्या शिकारीसाठी शेतात ठेवला गावठी बाँब, अन्..; करवीर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 7:10 PM