मलकापूर : पिशवी पैकी वरेवाडी येथील मांडलाईच्या जंगलात विनापरवाना चोरटी शिकार करणाऱ्या पाच जणांना वन विभागाच्या पथकाने पकडून शाहूवाडी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना तीन दिवसाची फॉरेस्ट कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून दोन मोटरसायकलसह दोन बंदुका, दोन मृत ससे, दोन मृत पिसुरे मांस असे मिळून अडीच लाख रुपयाचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे.
फॉरेस्ट कोठडी मिळालेल्या संशयित आरोपींची नावे अशी - बबलू ऊर्फ प्रवीण विश्वास बोरगे (वय २९), नाना ऊर्फ बाजीराव बाबू बोरगे (४५), पिंटू ऊर्फ मारुती पांडुरंग वरे (३०), पोपट ऊर्फ संजय हिंदूराव भोसले (३३), रामचंद्र बाळू बोरगे (३३, रा. सर्व पिशवी पैकी वरेवाडी ता. शाहूवाडी जि कोल्हापूर, तर आबाजी बाजीराव बोरगे, अमोल शिवाजी रवंदे हे दोघेजण फरार झाले आहेत. ही घटना गुरुवार (दि २६) रोजी मध्यरात्री पिशवी गावाच्या जंगलात घडली.
वन विभागाकडुन मिळालेली महिती अशी, गुरुवार (दि २६) मे रोजी पिशवी पैकी खोतवाडी, वरेवाडीच्या जंगलात १० जण शिकारीसाठी जाणार आहेत, अशी गोपनीय माहिती मलकापूर वनपरिक्षेत्राचे वनअधिकारी अमित भोसले यांना मिळाली होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्याची दोन पथके तयार करून खोतवाडी-वरेवाडी-कुंभारवाडी येथे सापळा रचला होता. कुंभारवाडीच्या हुलवाणी क्षेत्रात बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकू आला. वन विभागाच्या पथकातील कर्मचारी सावध झाले. रात्री १२ वाजता मोटारसायकलवरून तिघेजण जात असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून प्रवीण बोरगे, बाजीराव बोरगे, मारुती वरे, संजय भोसले यांना पकडण्यात आले तर आबाजी बोरगे फरार झाला.
वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले, वनपाल यू.ए.नाईकडी, वनरक्षक विठ्ठल खराडे, अक्षय चौमुले, आशिष पाटील, रुपाली पाटील आदींनी ही कारवाई केली.