लोकमत न्यूज नेटवर्क
कदमवाडी : लाईन बझारमधील विभागीय लस भंडारसमोरील डेरेदार झाडाची सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली असून, हे झाड तोडण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयाने परवानगी घेतलेली नसून वृक्षप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
सध्या पावसाचे दिवस असल्याने शहर व जिल्ह्यात शासकीय यंत्रणेच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा असे सांगितले जात असले तरी कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या विभागीय लस भंडारच्या परिसरात असणारे भले मोठे चिंचेचे झाड फांद्या मारण्याच्या नावाखाली विनापरवाना कत्तल केले जात होते.
याबाबत या औषध भंडारचे प्रमुख औषध निर्माण अधिकारी श्री. माळी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे झाड भंडारगृहाच्या समोरच असून त्याच्या फांद्या गाडी पार्किंगच्या आडव्या येत असल्याने परवानगीशिवाय तोडत असल्याचे सांगितले.
याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे तक्रार केली असून त्यांनी जागेवर येऊन पहाणी केली असता तेथे कोणीही उपस्थित नव्हते.
-------------
आताच अडचण कशी
औषध भंडारचे बांधकाम होऊन गेली दोन-तीन वर्षांपासून वापरात असलेल्या औषध भंडारला त्या झाडाची व फांद्याची आत्ताच कशी अडचण झाली व तोडण्यासाठी सुट्टीचा दिवस कसा मिळाला हे आश्चर्य आहे.
------------‐
पालिकेत फेऱ्या मारल्या
याबाबत परवानगी घेण्यासाठी आपण महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागात फेऱ्या मारल्या, पण कोणी दाद दिली नसल्याचे माळी यांनी सांगितले, पण एखाद्या झाडांच्या फांद्या मारणे किंवा झाड तोडण्यासाठी लेखी अर्ज करावा लागतो हे देखील या शासकीय कर्मचाऱ्यांना माहीत नसावे हे दुर्दैव.
--------
फोटो ओळी
शासनाच्या विभागीय लस भंडारच्या आवारात असणारे चिंचेचे झाड तोडताना खासगी कर्मचारी. (फोटो-२२०८२०२१-कोल-कदमवाडी) (छाया- दीपक जाधव)